वसई: दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने वसई शहर खऱ्या अर्थाने उत्साहाच्या रंगात न्हाऊन निघाले. ढोल ताशांचा निनाद, आतषबाजीची तेजस्वी रोषणाई, दिपोत्सव, गंगा आरती आणि पारंपारिक कलाविष्कारांनी ही संध्याकाळ अविस्मरणीय ठरली. वसई-विरार शहरात दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, पाडव्यानिमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहरात आनंदी आणि चैतन्यमय वातावरण निर्माण केले.
वसई पश्चिमेकडील झेंडा बाजार परिसरात शिव साम्राज्य संस्थेच्या वतीने दिवाळी पाडवा कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने वसईतील तब्बल सात ढोल-ताशा पथकांनी केलेल्या दमदार गजरात आणि लेझिम नृत्याच्या उत्साही साथीने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीनंतर परिसरातील मारुती मंदिरात विधिवत गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे वातावरण अधिक भक्तिमय झाले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाचा शेवट ब्रास बँडवर वाजविण्यात आलेल्या पारंपारिक कोळी गीतांनी करण्यात आला. या कार्यक्रमात तरुण, वृद्ध आणि लहान मुलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
याचप्रमाणे दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पेशवे चिमाजी अप्पा स्मारकाच्या आवारात शिवसेना (उबाठा) पक्षाकडून आकर्षक दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो दिव्यांच्या रोषणाईने हा परिसर उजळून निघाला होता. तर शहरात अनेक ठिकाणी संगीत संध्या आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे वसईकरांची दिवाळी खऱ्या अर्थाने चैतन्यमय ठरली.