वसई: वसई, विरार शहराच्या विविध ठिकाणच्या भागात होळी आणि धुळवड मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवारी शहरी व ग्रामीण भाग मिळून अनेक गाव पाडय़ात होळीचे पूजन करण्यात आले. शहराच्या विविध भागात, सोसायटय़ांच्या आवारात तर ग्रामीण भागात मोकळय़ा जागेत होळया लावल्या होत्या. तर काही गावात  एक गाव एक होळी परंपरा कायम ठेवत होळी साजरी करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई, जूचंद्र, नारंगी, नायगाव कोळीवाडा, कोळीवाडे कामण, गोखीवरे, विरार यांसह इतर ठिकाणच्या गावागावांत पारंपरिक पद्धतीने होळया उभारण्यात आल्या होत्या. या होळीच्या निमित्ताने लहान मुले, महिला वर्ग, पुरुष मंडळी पारंपरिक व शांत सार्वजनिक ठिकाणच्या होळी उत्सवात सहभागी झाले. गावातील नवविवाहित दाम्पत्यही होळीभोवती फेऱ्या मारताना दिसून आले. तर होळीचे पूजन झाल्यानंतर प्रसाद घेण्यासाठी सर्वाचीच झुंबड उडाली होती. तसेच रात्री विविध ठिकाणी मनोरंजनात्मक खेळ, नृत्य, होळीची पारंपरिक गीते, नाटय़मय कार्यक्रम सादर करण्यात आले या कार्यक्रमात अनेकांनी विविध प्रकारच्या परितोषिकांची लयलूटही केली. मात्र रात्रीच्या सुमारास अवेळी पडलेल्या पावसामुळे काही होळी सणानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमावर विरजण पडले. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला.

होळीनंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी विविध ठिकाणी सकाळपासूनच धूलिवंदनला सुरुवात झाली. लहान मुलांनी एकमेकांना रंग लावण्यासाठी, फुगे उडविण्यासाठी चांगलीच धावपळ सुरू होती. तर काही भागात ढोल ताशा व बेंजो व डीजेच्या तालावर नृत्य करीत धुळवड साजरी केली जात होती. काहींनी वेशभूषा साकारून शिमग्याची विविध प्रकारची सोंगे करून गावागावांत नाचताना दिसून आले. त्यामुळे वसई विरार हे होळी व धुळवडीनिमित्ताने चांगलेच रंगमय झाले होते. अनेक ठिकाणी धुळवडीनिमित्त खासगी पाटर्य़ाचे आयोजन करण्यात आले होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Holi in vasai virar city dhulwad in excitement celebrating with enthusiasm ysh