वसई : वसई विरार मध्ये नवीन वाहने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. वर्षभरात शहरात ८४ हजार ३८५नवीन वाहने दाखल झाली आहेत. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडू लागली आहे. दिवसाला सरासरी सव्वा दोनशेहून अधिक वाहने दाखल होत आहेत.

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. मुंबईसह इतर ठिकाणचे नागरिकही आता वसई विरार मध्ये घरे घेऊन राहण्यास आले आहेत. त्यामुळे लोकसंख्ये सोबतच वाहनांची गर्दी ही प्रचंड प्रमाणात वाढू लागली आहे. सुरवातीला सणांचे औचित्य साधून वाहने खरेदी केली जात होती. मात्र दुचाकी,चारचाकी ही वाहने सध्या एकप्रकारे नागरिकांची गरज बनू लागली आहे. त्यामुळे इतर दिवशीही वाहने खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे.

हेही वाचा : दोन दिवसात एकाच कुटुंबातील ७ जण बेपत्ता, नालासोपारा पोलिसांनी लावला छडा

यंदाच्या वर्षात शहरात ८४ हजार ३८५ इतकी वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली आहे. सद्यस्थितीत शहरात ७ लाख ३७ हजार इतकी वाहने आहेत. मागील दोन वर्षांपासून वाहनांच्या संख्येत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ होत आहे असे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

वाहतूक कोंडीची समस्या

शहरात वाहनांची संख्या १५ लाखांच्या घरात जाण्याची शक्यता परिवहन विभागाने वर्तवली आहे. परंतु वाढत्या वाहनांच्या संख्येनुसार वाहतूक नियोजन होत नाही तर दुसरीकडे अरुंद रस्ते, वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही त्यामुळे मुख्य रस्त्याच्या ठिकाणी वाहने उभी करावी लागत आहेत.अशा विविध प्रकारच्या अडचणीमुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच जटिल बनली आहे.

हेही वाचा : गणेशोत्सवाची खरेदी करून परताना दुचाकीचा अपघात, चांदीप येथील घटना ; बारा वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

विद्युत वाहनांची संख्या वाढली

इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे इलेक्ट्रिक वाहने घेण्याकडे नागरिकांचा कल अधिकच वाढला आहे. यंदाच्या चालू वर्षात ५ हजार ४२४ इतकी विद्युत वाहने दाखल झाली आहेत. यात सर्वाधिक दुचाकीं व चारचाकी वाहनांचा समावेश आहे.

दाखल वाहने आकडेवारी

वर्षवाहन संख्या
२०२०-२१५४ हजार ३११
२०२१ -२२५६ हजार ७७
२०२२- २३७५ हजार ९००
२०२३- २४८४ हजार ३८४