वसई : वसई विरार शहरातील शेती टिकावी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नावीन्यपूर्ण शेतीकडे वळावे म्हणून जिल्हा कृषी विभाग आणि पंचायत समितीच्या वतीने लवकरच शेतकऱ्यांसाठी कृषी सहलीचे आयोजन केले जाणार आहे. यात वसईतील शेतकऱ्यांना पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणी क्षेत्रभेटी साठी नेले जाणार आहे. अशी माहिती पंचायत समितीकडून देण्यात आली आहे.
वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणात विविध पिकांसह फुलशेती केली जाते. यात मुख्यतः भात शेती, नारळ, सुपारी, केळी आणि भाजीपाल्याची लागवड केली जाते. शहरात पिकणाऱ्या फळांना, भाजपाल्याला तसेच फुलांना मुंबईच्या बाजारात चांगली मागणी असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून वाढते शहरीकरण, शेतीसाठी मजूर उपलब्ध नसणे, शेतमालाला योग्य भाव न मिळणे यासह विविध शेतीविषयक समस्यांमुळे वसई विरार शहरातील शेतीचे करण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतीकडे वळावे तसेच नवे नवे प्रयोग करावे यासाठी आता जिल्हा कृषी विभाग आणि पंचायत समिती यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्याकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांसाठी कृषी सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमातंर्गत वसई तालुक्यातील शेतकऱ्यांना पालघर जिल्ह्यातील इतर तालुक्यांत अनोख्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीबद्दल माहिती दिली जाणार आहे. तसेच त्याच्यासाठी क्षेत्रभेटीचे आयोजनही केले जाणार आहे. यावेळी प्रयोगशील पद्धतीने शेती करणाऱ्या वसई तालुक्यातील काही निवडक शेतकऱ्यांवर माहितीपट तयार करून तो ही इतर शेतकऱ्यांना दाखवली जाणार आहे.
गेल्या काही काळात वसई तालुक्यातील शेती क्षेत्र कमी होत चालले आहे. जागेचा अभाव, शेतमालाला मिळणारा कमी दर अशा विविध कारणांमुळे वसई तालुक्यातील एकरांची शेती आता गुंठ्यांवर आली आहे. त्यामुळे शहरातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कृषी सहल हा उपक्रम राबवला जाणार आहे. – घनश्याम पाटील, कृषी विस्तार अधिकारी