वसई : मागील दहा वर्षांपासून रखडलेल्या खानिवडे येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला जानेवारी महिन्यात सुरवात करण्यात आली होती. मात्र सुरू असलेले काम हे अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. आतापर्यंत केवळ ३० ते ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हे रुग्णालय पूर्ण होण्यास विलंब होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडल्यास व आजूबाजूच्या गाव पाड्यात राहणाऱ्या नागरिकांना वैद्यकीय उपचार मिळविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते. अशा नागरिकांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने २०१४ मध्ये महामार्गावरील खानिवडे येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी सर्व्हे क्रमांक १४८ व १६२ मधील ०.९९ हेक्टर इतकी जागा ही निश्चित करण्यात आली होती.
मात्र या रुग्णालयाच्या कामात वनविभागाच्या जागेचा हस्तांतरण प्रश्न, आराखड्यातील बदल, प्रशासकीय मंजुरी साठी झालेला विलंब अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. जवळपास दहा वर्षे या रुग्णालयाचे काम रखडले होते.त्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये बांधकामाच्या आराखड्याच्या कामाला शासनाची प्रशासकीय मान्यता मिळताच निविदा प्रक्रिया पूर्ण करून सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाला सुरुवात केली होती. या बांधकामासाठी १३ कोटी ३२ लाख रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे.
उभारण्यात येणारे रुग्णालय हे दोन मजली असून त्याचे क्षेत्र ३ हजार ३९९ चौरस मीटर इतके आहे. काम सुरू होऊन आठ महिने उलटून गेले आहेत. मात्र या रुग्णालयाचे काम अगदीच धीम्या गतीने सुरू आहे. आतापर्यंत केवळ ३० ते ३५ टक्के इतकेच काम पूर्ण झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. जर अशाच प्रकारे काम सुरू राहिले तर काम पूर्ण होण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
मागील काही वर्षांपासून रुग्णालय उभारणीच्या घोषणा होतात. मात्र प्रत्यक्षात पूर्ण होताना दिसत नाही अशी प्रतिक्रिया ही नागरिकांनी दिली आहे.रुग्णालयात उभारणीचे काम सुरुच आहे. पावसामुळे कामात अडथळे निर्माण झाले होते. आता पावसाळा संपताच त्यांचे दिलेल्या वेळेत पूर्ण करवून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय यादव यांनी सांगितले आहे.
अशा मिळणार सुविधा
तळ मजला- मेडिकल स्टोअर, पोलिस चौकी, स्टोअर
पहिला मजला – पॅथॉलॉजी लॅब, सोनोग्राफी कक्ष, रक्तपेढी,
एक्स-रे कक्ष, ओपीडी ४, ड्रेसिंग कक्ष, रीफ्रेंक्शन कक्ष, रीकव्हरी कक्ष.
दुसरा मजला-कॉन्फरन्स हॉल, आस्थपना विभाग, वैद्यकिय अधिक्षक कक्ष, मेलवॉर्ड, पेडियाट्रीक वॉर्ड, जनरल वार्ड, लेबर कक्ष, प्रसाधनगृह याचासमावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.