वसई: बोरिवली ते विरार दरम्यान ५ आणि ६ क्रमांकाच्या रेल्वेमार्गिकांच्या भूसंपादनासाठी नागरिकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यात वसईतील ६ इमारती आणि २ खाजगी इमारती बाधित होणार आहेत. बाधित भूधारकांना बाजारभावापेक्षा कमी मोबदला दिला जात असल्यामुळे तसेच काही रहिवाशांच्या जागांवर रेल्वे प्रशासनाने थेट हक्क सांगितल्यामुळे रहिवाशांनी जोरदार विरोध केला आहे. योग्य मोबदला न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

बोरीवली ते विरार दरम्यान ५ आणि ६ क्रमांकाच्या रेल्वेमार्गिकांचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. वसई, नालासोपारा आणि विरार या भागात मार्गिका टाकताना १६ हेक्टर जागेची गरज भासणार आहे. तर वसई ते नायगाव दरम्यान ३० ट्रॅकसाठी यार्ड तयार करण्यात येणार आहे. यासाठी काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने भूसंपादनासाठी सर्वेक्षण सुरु केले होते. सर्वेक्षणानंतर रेल्वेने प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेनुसार वसई रोड रेल्वे स्थानकालगत असलेल्या आनंदनगर परिसरातील ६ इमारती आणि २ खाजगी इमारती बाधित होणार आहेत. यात शिवशक्ती अपार्टमेट, आदर्श अपार्टमेंट, शांती अपार्टमेंट, जयेशकृपा अपार्टमेंट, चंपासदन अपार्टमेंट आणि गुरुकृपा अपार्टमेंट या ६ इमारतींचा समावेश आहे. तर बशीर मंजिल आणि हरिद्वार हाऊस या दोन खाजगी इमारतींचाही समावेश आहे. या इमारती ३५ ते ४० वर्ष जुन्या असून यात २५० खोल्या आहेत. ज्यात १२०० ते १५०० रहिवाशी वास्तव्यास आहेत.

योग्य मोबदला न दिल्यास आंदोलनाचा इशारा

१७ जून रोजी रेल्वेने मोबदल्यासंदर्भात नोटिसा पाठवल्या. मात्र, त्यातील नमूद केलेले मोबदल्याचे मूल्य बाजारभावापेक्षा खूपच कमी असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. “रेल्वेने मोबदला देताना तो बाजारमूल्याऐवजी बांधकाम मूल्यानुसार जाहीर केला आहे. सध्या इमारतीतील सदनिकांची किंमत ५० ते ६० लाख, तर दुकानांची किंमत १ कोटीच्या घरात आहे. मात्र, दोन्हीसाठी जास्तीत जास्त १५ ते २० लाखांचा मोबदला दिला जातोय, जो अत्यंत कमी आहे,” अशी प्रतिक्रिया रहिवासी विजय सामंत यांनी दिली. अनेकदा नोटिसा पाठवूनही प्रशासनाने त्यावर काहीच उत्तर दिले नसल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, काही रहिवाशांच्या जागांवरच रेल्वेने थेट हक्क सांगितल्याचे समोर आले आहे. “आम्हालाही इतर रहिवाशांप्रमाणे नोटीस मिळायला हवी होती. मात्र चौकशी केल्यानंतर समजले की रेल्वेने आमच्या मालकीच्या जागेवरच हक्क सांगितला आहे. माझ्याकडे सर्वे क्रमांक ४३ चा सातबारा असून, त्यात जागा माझ्या आईच्या नावावर असल्याचे स्पष्ट नमूद आहे. तरीही रेल्वेच्या सर्वे क्रमांक ५१ मध्ये तीच जागा रेल्वेच्या नावावर दाखवली आहे,” असे बशीर मंजिल येथील फजले हक बशीर कुरैशी यांनी सांगितले. या प्रकल्पाला आमचा मुळीच विरोध नाही, पण मोबदल्याला आहे. जर रेल्वे प्रशासनाला मोबदला द्यायचा नसेल, तर त्यांनी आम्हाला घरे उपलब्ध करून द्यावीत, असे मत रहिवासी जोएल डिसूझा यांनी व्यक्त केले. योग्य मोबदला न मिळाल्यास रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन पुकारण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

रेल्वे मार्गिकेच्या भूसंपादनाच्या संदर्भात शासनाने ज्या सूचना केल्या आहेत त्यानुसार आमचे काम सुरू आहे. तसेच ज्यांनी याबाबत हरकती घेतल्या आहेत. त्यांची सुनावणी घेऊन  मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोबदल्याचा जो प्रश्न आहे त्याबाबत त्यांना त्याची आर्बिट्रेशन येथे बाजू मांडण्याचा सल्ला दिला जात आहे. ही बाब आम्ही रेल्वेला सुद्धा कळविली आहे. – शेखर घाडगे, उपविभागीय अधिकारी वसई