भाईंदर : मिरारोड येथील पेणकर पाडा गावात नव्याने उभारण्यात येणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य केंद्रास स्थानिकांनी विरोध केला आहे. सदर जागा ही मैदानासाठी आरक्षित असून मोकळी सोडावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.मिरा रोड येथे पेणकर पाडा गाव आहे.

मागील काही वर्षात या गावाच्या आसपास मोठ्या प्रमाणात झोपड्या उभारण्यात आल्या असून लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे.त्यामुळे येथील नागरिकांना आता ही जागा अपुरी पडत आहेत. दरम्यान येथील आरक्षण क्रमांक २५३ वर महापालिकेने आरोग्य केंद्र उभारण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र यास स्थानिकांकडून विरोध केला जात आहे.याबाबत पेणकर पाडा गाव ग्रामस्थांनी महापालिकेला काम न करण्याबाबत चे पत्र दिले आहे.

यामध्ये सदर जागा ही जुन्या विकास आराखड्यात दफनभूमीसाठी तर नव्या आराखड्यात खेळाच्या मैदानासाठी आरक्षित करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गावातील लहान मुलांचा सर्वांगीण विकासासाठी हे मैदान विकसित करण्यात यावे आणि आरोग्य केंद्र अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे अशी स्थानिकांची मागणी आहे. तर ग्रामस्थांच्या या मागणीवरून लवकरच बैठक घेणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.