लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई : वसई विरार शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे विजेची मागणी वाढत आहे. याशिवाय सातत्याने महावितरण वीज चोरट्यांवर होणारी कारवाई यामुळे नवीन वीज जोडण्या घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. मागील दोन वर्षात ७४ हजार २७४ इतक्या नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

वसई विरार शहरात विविध ठिकाणी इमारती, बैठ्या चाळी विकसित होत आहेत. तर दुसरीकडे औद्योगिक क्षेत्राच्या मोठं मोठ्या वसाहती यांचा विस्तार होऊ लागला आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. दोन वर्षांपूर्वी वसई विरार मध्ये ९ लाख २६ हजार २२६ इतके घरगुती , वाणिज्य आणि औद्योगिक, कृषी , पथदिवे, पाणी पुरवठा व इतर असे वीज ग्राहक होते. मात्र अलीकडच्या काळात नवीन वीज जोडणीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज हे महावितरण कडे दाखल होऊ लागले आहे. तर दुसरीकडे महावितरणने सातत्याने वीज चोरांवर कारवाई सुरूच ठेवली आहे. त्यामुळे जे वीज चोरी करणारे होते ते सुद्धा नवीन वीज जोडण्या घेण्यासाठी पुढे येत असल्याने वीजेच्या मागणीत वाढ झाली आहे.

आणखी वाचा-सायबर भामट्यांनी केले ‘डिजिटल अरेस्ट’, वसईतील आयटी तज्ञाला दीड कोटींचा गंडा

शहराला १ हजार ४७४ मेगा व्हॅट इतकी विजेची मागणी आहे. मागील दोन वर्षात महावितरणने ७४ हजार २७४ इतक्या नवीन वीज जोडण्या दिल्या असून सद्यस्थितीत महावितरणची ग्राहक संख्या ही १० लाख ५०० इतकी झाली असल्याचे महावितरणने सांगितले आहे. दरवर्षी पाच ते सहा टक्क्यांनी वीज ग्राहकांच्या संख्येत वाढ होत आहे असे महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे.

उपकेंद्रांची निविदा प्रक्रिया पूर्ण

वाढत्या विजेच्या मागणीमुळेवीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर ताण येऊन वीज पुरवठा खंडित होण्यासह अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाढती विजेची मागणी व भविष्यात लागणारी वीज याचा विचार करून महावितरणने पोमण, चिखलडोंगरी, एच डीआय एल चंदनसार व सुरक्षा सीटी अशा चार ठिकाणी २२०/ २२ केव्हीची उपकेंद्र प्रस्तावित केली आहेत.त्यातील पोमण (कामण) व चिखलडोंगरी येथील केंद्राची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरवात केली जाईल असे महावितरणच्या अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे.

आणखी वाचा-मिरा भाईदर महापालिका शाळेतील सुरक्षा रक्षकांनाही ‘मर्यादा; बदलापूर येथील घटनेनंतर खबरदारी

धोकादायक वीज जोडण्या थांबवा

वसई विरार शहरात अनधिकृत बैठ्या चाळी मोठ्या प्रमाणात उभारल्या जात आहेत. त्यांना महावितरणकडून धोकादायक पद्धतीने वीज जोडण्या दिल्या जात आहेत.वीज पुरवठा करताना कोणत्याही प्रकारचे खांब न उभारता केवळ वीज पेट्या उभारून त्यांना वीज जोडण्या दिल्या जाऊ लागल्या आहेत. काही ठिकाणी वीज जोडण्या जमिनीवर उघड्या अवस्थेत अंथरून वीज पुरवठा केला जातो. यामुळे विजेचा धक्का लागून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे अशा धोकादायक वीज जोडण्या थांबविण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

वीज ग्राहकांची संख्या

२०२२- ९ लाख २६ हजार २२६
२०२३- ९ लाख ७३ हजार २३३
२०२४- १० लाख ५००

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitaran electricity customers increased adding 74 thousand new electricity connection in two years mrj