वसई: शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. याशिवाय खड्डय़ांच्या तक्रारी व फोटो पाठविण्याचे आवाहन केले होते. आतापर्यंत खड्डय़ांच्या संदर्भात पालिकेकडे १ हजार ३२ तक्रारी आल्या आहेत. त्यातील केवळ दीडशे खड्डे आतापर्यंत बुजविण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसामुळे वसई, विरार शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य तयार झाले आहेत. या खड्डय़ांमुळे वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागत होता. तर काही वेळा या खड्डय़ांमुळे अपघाताच्या घटनाही घडत होत्या. त्यामुळे खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. मात्र सतत पाऊस सुरू असल्याने खड्डे बुजविण्यास अडचणी निर्माण होत होत्या. आता पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पालिकेने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी प्रत्येक प्रभागात बांधकाम विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व ठेकेदार यांचे पथक तयार करून सर्वेक्षण करण्यात येत आहे.

याशिवाय नागरिकांनाही आपल्या विभागातील खड्डय़ांच्या तक्रारी व त्यासोबत छायाचित्र पाठविण्याचे आवाहन पालिकेने केले होते. पालिकेने दिलेल्या तक्रार क्रमांकावर आतापर्यंत १ हजार ३२  खड्डय़ांच्या तक्रारी आल्या असून त्यापैकी आता दीडशे खड्डे बुजविण्यात आले असल्याची माहिती पालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता राजेंद्र लाड यांनी सांगितले आहे. या खड्डे दुरुस्तीच्या कामासाठी १२ ठेकेदार नेमले आहेत. रस्त्यावर पडलेला खड्डा योग्य प्रकारे बुजविले जावे यासाठी पालिकेकडून आता खड्डा पडलेल्या ठिकाणी योग्यरीत्या खोदकाम करून चौकट तयार केली जात आहे, त्यात पेव्हर ब्लॉक, विटा व सिमेंट काँक्रीट मटेरियल वापरून रस्त्याला एक समांतर असे खड्डे बुजविले जात आहेत, असे लाड यांनी सांगितले आहे. सद्य:स्थितीत पेव्हर ब्लॉक व सिमेंट मटेरियल वापरून खड्डे बुजविले जात आहेत. पाऊस कमी होताच रस्त्याचे डांबरीकरण करण्याची तरतूद केल्याचे लाड यांनी सांगितले.

पावसामुळे अडचणी

मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे, त्यामुळे खड्डे बुजविताना अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी खड्डय़ात पाणी साचून राहते तिथे खोदकाम करता येत नाही. तर काही भागांतील रस्ते हे अधिक रहदारीचे असल्याने त्याठिकाणीसुद्धा विशिष्ट वेळेचे नियोजन करून खड्डे दुरुस्तीचे काम सुरू केले आहे, असे पालिकेने सांगितले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than a thousand complaints about potholes in the road vasai virar municipality has started filling potholes ysh