वसई: वृक्षांची स्थिती माहीत व्हावी यासाठी दर पाच वर्षांनी वृक्ष गणना केली जाते. मात्र आठ वर्षे उलटून गेली तरीही वसई विरार शहरातील वृक्षांची गणनाच झाली नसल्याचे समोर आले. त्यामुळे पालिकेने वृक्ष गणनेकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वसई-विरार शहराचे झपाट्याने नागरीकरण वाढू लागले आहे. यामुळे काही ठिकाणी वृक्षतोडही केली जाऊ लागली आहे. शहरातील वनीकरणाचा पट्टा वाढावा व पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी पालिकेकडून वृक्षारोपणासारखे विविध उपक्रम राबविले जात आहेत परंतु शहरात असलेल्या वृक्षांची माहिती पालिकेला मिळावी यासाठी वृक्ष गणना ही होणे गरजेचे आहे. यामुळे शहरातील वृक्षांची आकडेवारी व माहिती समोर येत असते. यापूर्वी पालिकेने २०१६ मध्ये वृक्ष गणना केली होती. त्यावेळी पालिकेच्या कार्यक्षेत्रात १४ लाख १४ हजार ४०८ वृक्षांची नोंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पाच वर्षांनंतर पुन्हा वृक्ष गणना होणे अपेक्षित होते. करोनाच्या संकटामुळे वृक्ष गणनेला खीळ बसली होती. त्यानंतर २०२२ मध्ये पुन्हा एकदा राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे वृक्ष गणना केली जाणार होती. या गणनेत वृक्षाची प्रजाती, नाव, फळजाती, उंची, वय, घेर, रंग, सुवास, वृक्षाची शास्त्रीय माहिती, त्याचा उपयोग अशा विविध अंगांनी माहिती नोंदविली जाणार होती. तीसुद्धा प्रक्रिया पुढे न सरकल्याने वृक्ष गणना रखडली आहे. याआधी वृक्ष गणना होऊन आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही वृक्षगणना करण्यास पुढाकार का घेत नाही, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
वृक्ष गणनेमुळे बेकायदेशीर वृक्षतोडीला आळा
वसई विरार शहरात हळूहळू प्रदूषणाचे प्रमाण वाढीस लागत आहे. शहरात छुप्या मार्गाने बेकायदेशीरपणे वृक्षांची कत्तल होत असते. जीआयएस टॅगिंगद्वारे आता वृक्ष गणना होत असल्याने झाडांना इजा पोहोचविणे, वृक्षतोड झाल्यास याची सर्व माहिती पालिकेला समजणार आहे, तर दुसरीकडे वृक्षगणनेमुळे शहरातील हरित पट्टा किती प्रमाणात याची माहिती पालिकेला समजणार असून येत्या काळात आणखी वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धन करण्यास मदत होणार आहे. यासाठी शहरात वृक्ष गणना करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
पालिकेकडून प्रयत्न सुरू
पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी वृक्ष लागवड, मियावाकी वने तयार करणे अशी उपक्रम राबविले जात आहेत. याशिवाय वृक्ष गणना करण्यात यावी यासाठी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा – नालासोपाऱ्यातील रक्तरंजित संघर्ष, ११ जणांना अटक
एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
वसई-विरार महापालिकेने २०१७ ते २०२० या तीन वर्षांत शिरगाव, नारंगी, खार्डी कोशिंबे, धानिव अशा विविध ठिकाणच्या भागांतील २७९ हेक्टर क्षेत्रात ३ लाख ९ हजार ३७५ इतक्या वृक्षांची लागवड केली होती. त्यातील २ लाख ६८ हजार ४२४ इतके वृक्ष सुस्थितीत आहेत. मागील वर्षी करोना संकट व जागेअभावी वृक्ष लागवड करता आली नव्हती. मागील वर्षी व यंदाही १ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी सामाजिक संस्था यांची मदत घेतली जाणार असल्याचे वृक्षप्राधिकरण विभागाच्या उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी सांगितले आहे.