वसई: नायगाव पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांनी वाहतूक करू नये यासाठी उंची मर्यादा लोखंडी कमानी बसविल्या होत्या. मात्र वाहनांच्या धडकेत दोन्ही बाजूच्या कमानी तुटल्या आहेत त्यामुळे सर्रासपणे अवजड वाहनांची ये जा सुरू झाली आहे.
नायगाव पूर्व व पश्चिमेचा परिसर शहराला जोडण्यासाठी उड्डाण पूल तयार करण्यात आला आहे. या पुल सद्यस्थितीत केवळ हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी असून अवजड वाहनांना या पुलावर बंदी घातली आहे. अवजड वाहने या पुलावरून जाऊ नये यासाठी पुलाच्या पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूने लोखंडी उंची मर्यादा कमानी बसविण्यात आल्या आहेत. मात्र या दोन्ही बाजूच्या उंची मर्यादा कमानी वाहनांच्या धडकेत तुटल्या आहेत. त्यामुळे सहजरीत्या आता पूर्व पश्चिम अशी अवजड वाहनांची वाहतूक होऊ लागली आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे वळणाच्या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अशी वाहने सुरू राहिल्यास पुलाला सुद्धा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे असे येथील नागरिकांनी सांगितले आहे.
तुटलेली कमान धोकादायक स्थितीत
नुकताच एका टेम्पोच्या धडकेत पश्चिम भागातील लोखंडी कमान तुटली आहे. तुटलेली कमान वेळीच काढून न टाकल्याने ती धोकादायक स्थितीत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सुद्धा चार ते पाच वेळा ही लोखंडी कमान कोसळण्याची घटना घडली होती.सातत्याने कमान कोसळत असल्याने ही कमान केवळ वेल्डिंग न करता पूर्ण कमानच नवीन करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.