वसई: नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथील साई सिमरन इमारतीत सदनिकेचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे.मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. यात अडकून पडलेल्या दोन जणांची अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली आहे.नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथे साई सिमरन अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत आहे. ही इमारत १३ ते १४ वर्षे जुनी आहे. यात २२ सदनिका व ३ गाळे आहेत.

मंगळवारी रात्री अचानकपणे या इमारतीमधील ४०४ या सदनिकेचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे इमारतीमध्ये खळबळ उडाली होती. याची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहचून सदनिकेत अडकून पडलेल्या १४ वर्षीय मुलगा व ४७ वर्षीय महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

या घटनेमुळे इमारती मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या घडलेल्या घटनेनंतर महापालिका व अग्निशमन दल यांनी इमारती मधील २२ खोल्या खाली करून तेथील नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न निर्माण झाला आहे.

धोकादायक इमारतींकडे पालिकेचे दुर्लक्ष

वसई विरार महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे. पावसाळा तोंडावर आला तरीही वसई विरार महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करणे, आवश्यक उपाययोजना करण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शहरातील धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.