वसई: वसई विरार शहरात मोठ्या उत्साहात छठ पूजा उत्सव साजरा केला जात आहे. महापालिकेने दिलेल्या परवानगीनंतर शहरातील समुद्रकिनारे, तलाव, नदी या ठिकाणी उत्तरभारतीय महिलांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. पर्याप्त रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यामुळे गेल्या काही वर्षात वसई विरार शहरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय नागरिक स्थलांतरित झाले आहेत. वसई पूर्व, नालासोपारा पूर्व आणि पश्चिम, नायगाव पूर्व तसेच विरारमधील परिसरात बिहार, उत्तरप्रदेश, उत्तराखंड अशा विविध राज्यातून स्थलांतरित झालेले उत्तर भारतीय मोठ्या संख्येने वास्तव्यास

गेल्या काही वर्षात उत्तर भारतीय नागरिकांच्या लोकसंख्येत झालेली वाढ आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा मोठ्या उत्साहात छठ पूजा उत्सव वसई विरार शहरात साजरा केला जात आहे. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार समुद्रकिनारे, नदी तलाव या नैसर्गिक जलस्रोतांच्या ठिकाणी पूजेसाठी खास व्यवस्था करून देण्यात आली आहे.

३६ तासांच्या निर्जल उपवासानंतर छठ उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी संध्याकाळी सूर्याला नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच अर्ध्य अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने महिलांनी पूजा सामग्रीसह तलाव आणि समुद्रकिनारी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले आहे.

पावसामुळे छठ पूजेत व्यत्यय

गेल्या काही दिवसांपासून वसई विरार शहरात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. दिवसभर उसंत घेतलेल्या पावसाने सोमवारी संध्याकाळी पुन्हा एकदा शहरात हजेरी लावली. तर सूर्यास्ताच्यावेळी छठ पूजेसाठी बाहेर पडलेल्या महिलांना मात्र पूजेचे सामान भिजल्यामुळे तसेच वाहतुक कोंडीमुळे अडचणींना सामोरे जावे लागले.

छठ पूजेसाठी विशेष सुविधा

महापालिकेकडून छठ पूजेच्या ठिकाणी नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात निर्माल्य कलश, निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वच्छता गाड्या, सीसीटीव्ही कॅमेरे, दिवे सोडण्यासाठी ४० ठिकाणी कृत्रिम तलाव, सुरक्षारक्षक, विशेष बससुविधा या सुविधांचा समावेश आहे.