वसई:  रविवारी दीड दिवसांच्या गणपतींना भक्तिभावाने निरोप देत विसर्जन करण्यात आले. वसई विरार शहरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. वसई-विरारमधील शनिवारी अनेक कुटुंबांच्या घरोघरी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्याच गणेशाचे गणेश चतुर्थीला पूजन करून दुसऱ्या दिवशी रविवारी मोठ्या भक्तीमय वातावरणात दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.

यंदाच्या वर्षीही पालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. विसर्जनासाठी ५८ ठिकाणी १०५ इतके कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. या कृत्रिम तलावाला चांगला प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. बाप्पाला निरोप देण्यासाठी वसई-विरार शहरातील अनेक ठिकाणच्या विसर्जनस्थळी मोठी गर्दी झाली होती. यंदाही पालिकेने तलावात होणारे प्रदूषण व तलावांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचे हौद तयार केले होते. त्यातही अनेक नागरिकांनी पुढाकार घेत विसर्जन केले.

हेही वाचा – वसईत डिजिटल अरेस्टचा आणखी एक बळी, निवृत्त महिला बँक अधिकाऱ्याला २८ लाखांचा गंडा

कृत्रिम तलावात विसर्जित केलेल्या मूर्ती ट्रकमधून दगड खाणींमध्ये असलेल्या तलावात विसर्जित करण्यात आल्या. पालिकेने विसर्जन स्थळावर चोख व्यवस्था ठेवली होती. याशिवाय विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय न होता शांततेच्या वातावरणात हे विसर्जन पार पडले. पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग विसर्जनाच्या व्यवस्था बघत होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत व ढोल, ताशा, मृदंगाच्या गजराने सारी वसई विरार नगरी दुमदुमली होती.

सुरक्षेसाठी बंदोबस्त 

विसर्जनादरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता व तसेच गाव तलावावर महापालिकेचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान सुरक्षारक्षक म्हणून ठेवण्यात आले होते. यावेळी हजारोच्या संख्येने गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी गणेश भक्तांनीही सहकार्य करीत विसर्जन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला.

हेही वाचा – डॉक्टर नसताना कर्मचाऱ्याकडून रुग्णावर उपचार, वसई पूर्वेच्या भोयदापाडा येथील बोगस डॉक्टरवर पालिकेची कारवाई

नैसर्गिक तलावात विसर्जन 

मूर्ती तलावात विसर्जित केल्यामुळे होणारे प्रदूषण लक्षात घेता यावर्षी तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन न करता विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. मात्र काही ठिकाणी आपली परंपरा जोपासत पारंपारिक पद्धतीने विसर्जन केले.