Open transportation of Waste in Vasai: वसई विरार शहरात नियमबाह्य पद्धतीने कचऱ्याची वाहतूक होऊ लागली आहे. दुर्गंधीयुक्त कचरा झाकून नेण्याऐवजी तो उघड्याच स्वरूपात त्याची वाहतूक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा वाहतुकीमुळे काही वेळा हा कचरा पुन्हा एकदा रस्त्यावर पडून अस्वच्छता निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
गेल्या काही वर्षात वसई विरार शहरातील नागरीकरण वाढले आहे. त्यामुळे शहरात तयार होणाऱ्या कचऱ्यातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. महापालिकेकडून नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदारामार्फत हा कचरा संकलित केला जातो आणि त्यानंतर तो कचराभूमीत नेऊन टाकण्यात येतो.
मात्र, कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवर ताडपत्री नसल्याने, ही वाहने योग्यरित्या झाकली गेली नसल्याने अनेकदा वाहनातील कचरा पुन्हा रस्त्यावर सांडतो. त्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरते. तसेच उघड्या कचरा वाहनांमुळे रस्त्यावर वाहनचालकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागते. तसेच रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे अस्वछता पसरते.
वारंवार तक्रार करून देखील महापालिका बेजबाबदारपणे कचऱ्याचे वाहतूक करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करत नाही त्यामुळे अशा ठेकेदाराला काय यादी टाकावे आणि संबंधित महापालिका अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) तालुकाप्रमुख काकासाहेब मोटे यांनी केली आहे.
कालबाह्य कचरा गाडीचा धोका
महापालिकेच्या ठेकेदारामार्फत कचरा संकलनासाठी वापरण्यात येणारी बहुतांश वाहने जुनी असल्याचा तसेच यांपैकी बऱ्याचशा वाहनांची फिटनेस तपासणी न करता ती चालवली जात असल्यामुळे अपघात होण्याचा धोका असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.