वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील सातीवली ते वसई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, यामुळे नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते’ अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
वसई पूर्वेतील सातीवली ते वसई रस्त्यावरील भोयदापाडा, रेंज नाका, सातीवली या रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यांमुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून त्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा आणि औद्योगिक वसाहत परिसरातून जाणारा हा रस्ता असल्याने येथे वाहनांची वर्दळ जास्त असते. पण रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे सकाळी आणि संध्याकाळी येथे वाहतुकीचा अक्षरशः खेळखंडोबा होतो, ज्यामुळे वाहतूक पोलिसांवरही मोठा ताण येतो. तसेच वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
वसई ते सातीवली या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अतुल काकासाहेब मोटे यांनी महापालिकेकडे केली आहे. प्रशासकीय राजवटीत शहराचा बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप करत, मोटे यांनी निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवणाऱ्या ठेकेदारांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी पालिकेला दिला आहे. पालिकेने शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. हळूहळू सर्वच खड्डे बुजविले जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे.