Power lines in Vasai underground work up to 45 km in first phase ysh 95 | Loksatta

वसईतील विद्युत वाहिन्या भूमिगत होणार, पहिल्या टप्प्यात ४५ किलोमीटरपर्यंतचे काम

वसई-विरार शहरात अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे विद्युतपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात.

Mahavitaran electricity rates
(प्रातिनिधिक छायाचित्र)

वसई: वसई-विरार शहरात अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे विद्युतपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. आता शहरातील विविध ठिकाणच्या भागांत विद्युत वाहिन्या या भूमिगत करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ४५ किलोमीटपर्यंतच्या वाहिन्या या भूमिगत केल्या जाणार आहेत.

वसई-विरार शहरात महावितरणतर्फे ९ लाख ३८ हजार घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक, कृषी, शासकीय अशा वीज ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. यासाठी शहरातील विविध ठिकाणी लोखंडी खांब उभारून त्यावरून वीजवाहक तारा टाकल्या आहेत. परंतु सध्या शहराचे वाढते नागरीकरण यामुळे दिवसेंदिवस विजेची मागणीही वाढली आहे. त्यामुळे वीज वाहक तारांचा त्यावर टाकलेल्या वाहिन्यांचा अधिकच गुंता झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. विशेषत: बैठय़ा चाळीच्या भागात, गर्दीच्या परिसरात असे प्रकार दिसून येतात.

तर काही वेळा वीजतारा लोंबकळत असतात त्यामुळेही अपघात होण्याचा धोका संभवतो. तसेच कधी कधी वीज तारांचे एकमेकांना घर्षण होऊन आगीच्या ठिणग्या बाहेर पडून आगीच्या दुर्घटना घडतात. पावसाळय़ातही शहरात वादळी वारे, तारांवर झाडे कोसळणे असे प्रकार होऊन विद्युतपुरवठा खंडित होत असतो व पावसाळय़ात सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकारही घडतात.

असे प्रकार रोखण्यासाठी महावितरण विभागाने वीज ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महावितरणकडून विविध उपाययोजना आखल्या जातात. आता महावितरणकडून शहरातील विविध  ठिकाणी असलेल्या वीजवाहक तारा या भूमिगत करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात ४५ किलोमीटर इतक्या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. यात विशेषत: करून वसई पूर्वेच्या भागाचा समावेश आहे. टप्प्याटप्प्याने व आवश्यकतेनुसार वीज तारा भूमिगत केल्या जात आहेत. ज्या ठिकाणी भूमिगत करणे शक्य नाही त्या ठिकाणी मोनोपोल, मोठे एच टी खांब उभारले जात आहेत असेही महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांना आळा

वसई-विरार शहरातील लोकसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे हा परिसर अधिकच दाटीवाटीचा बनला आहे. अशात काहीजण मुख्य विद्युत वाहक तारेवर आकडे टाकून छुप्या मार्गाने वीज चोरी करतात. याचा आर्थिक फटका महावितरणला बसतो. अशा वीज चोरांवर महावितरणकडून कारवाई केली जाते. जर वीजवाहक तारा भूमिगत झाल्यास आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

महावितरणकडून शहरात वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत वाहकतारा या भूमिगत करण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात ४५ किलोमीटपर्यंत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. 

– राजेश चव्हाण, अधीक्षक अभियंता महावितरण विभाग वसई

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 00:02 IST
Next Story
मुंबई-गुजरातला जोडणाऱ्या वर्सोवा पुलासाठी आणखी प्रतीक्षा