पावसाच्या हजेरीमुळे दुबार पेरणीचे संकट टळले; भात लागवडीच्या कामाची लगबग

वसई: मागील काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने आठवडाभरापासून चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे वसईसह विविध ठिकाणच्या भागांत एकाच वेळी भात लागवडीच्या कामाला वेग आला आहे. असे जरी असले तरी शेतात काम करण्यासाठी मजूरच मिळत नसल्याने मजुरांची कमतरता भासू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात हजेरी लावल्यानंतर महिनाभर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेली भातरोपे करपून जाऊन दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. पण जुलै महिन्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे भात लागवडीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. भातरोपे खणून त्याची लागवड करण्याचे काम सुरू आहे. सर्वत्र एकाच वेळी लागवडीची कामे अगदी जोमाने सुरू झाली आहेत. त्यामुळे काहींना शेतात काम करण्यासाठी शेतमजूर मिळेनासे झाल्याने भात लागवड करण्याच्या कामात अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.

शेतकऱ्यांना शेतावर काम करण्यासाठी मजूर शोधावे लागत आहे. मोठय़ा प्रयत्नाने एखाद दोन मजूर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. मजूर नसल्याने काही शेतकऱ्यांनी घरातील सदस्य व नातेवाईक यांना सोबत घेऊन शेतातील कामे उरकण्यास सुरुवात केली आहे. तर काही शेतकरी एकमेकांच्या शेतावर अदली-बदलीने जाऊन कामासाठी सहकार्य करीत आहेत. शेतात काम करण्यासाठी पुरेसे मजूर असल्यास कामेही झटपट होतात. मात्र आता मजुरांची चणचण असल्याने कामाचा कालावधीही वाढला आहे. जे काम ४ ते ५ दिवसांत व्हायचे त्या कामाला आता ८ ते १० दिवस लागत असल्याचे शेतकरी विश्वनाथ कुडू यांनी सांगितले आहे. काही ठिकाणी मजूर मिळाले तरीही त्यांची मजुरी यंदा वाढली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Presence rain averted crisis double sowing ssh