वसई: कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी स्वतंत्र कांदळवन विभाग तयार करण्यात आला आहे. महसुलविभागाच्या अखत्यारीत येत असलेले कांदळवन क्षेत्र आता कांदळवन विभागाचकडे वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. आता पर्यंत वसईतील ५०२ हेक्टर इतके कांदळवन क्षेत्र हे वर्ग करण्यात आले आहे.

वसई विरार मध्ये खाडी किनारे, पाणथळ जागा अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदळवने आहेत. या मध्ये काही कांदळवन क्षेत्र हे महसूल विभागाच्या अखत्यारीत येतो. पर्यावरणीय दृष्टीने ही कांदळवने महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तर कांदळवनांमध्ये विविध प्रकारचे पशु पक्षी ही आश्रयाला येत असतात. मात्र गेल्या काही वर्षात कांदळवन वृक्षांची तोड करून अनधिकृत बांधकामे उभारणे, माती भराव टाकून वने नष्ट करणे, वाळू उपसा करणे अशा कारणामुळे कांदळवने नष्ट होत आहेत. यामुळे पूरस्थितीसारख्या समस्यांना ही तोंड द्यावे लागत आहे. यासाठी कांदळवन क्षेत्र टिकवणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. यासाठी स्वतंत्र कांदळवन विभाग तयार करण्यात आला आहे. त्यांच्या मार्फत विविध उपक्रम राबवून कांदळवन क्षेत्राचे संवर्धन केले जात आहे.

सुरवातीला कांदळवने ही महसुल विभागाच्या अखत्यारीत येत होती. त्यांच्या मार्फतच यावर लक्ष ठेवून कारवाया केल्या जात होत्या. आता हीच कांदळवने स्वतंत्र तयार केलेल्या कांदळवन विभागाकडे वर्ग करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

आता पर्यंत महसूल विभागाने ५०२ हेक्टर कांदळवन क्षेत्र वर्ग केले असल्याचे उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी सांगितले आहे.३०२ हेक्टरचा ताबा मिळाला आहे. तर २०० हेक्टरचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कांदळवन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतीक मोडवान यांनी सांगितले आहे. महसूल विभागाकडे कांदळवन येते ते कांदळवन विभागाकडे वर्ग केल्यास स्वतंत्र लक्ष ठेवून कत्तली विरोधात कारवाई व संवर्धनासाठी उपाययोजना करण्यास मदत होणार आहे.

१५०० हेक्टर क्षेत्राची प्राथमिक पाहणी

आतापर्यंत वनविभागाचे अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी यांच्या मार्फत वसई विरार भागातील कांदळवन क्षेत्राची पाहणी करण्यात आली आहे. जवळपास १ हजार ५०० हून अधिक क्षेत्राची प्राथमिक पाहणी झाली आहे. आता यापुढे भूमी अभिलेख विभागाकडून पुन्हा पाहणी करून क्षेत्र अंतिम करून ताब्यात घेण्यात येणार आहे.

शासन स्तरावरून मिळालेल्या आदेशानुसार शहरातील जे कांदळवन क्षेत्र आहे त्यांची मोजणी करून त्याचा ताबा आम्ही वनविभाग यांच्या कडे देत आहोत. आतापर्यंत पाचशेहून अधिक क्षेत्र वर्ग झाले आहे. पुढील प्रक्रिया ही सुरू आहे. – शेखर घाडगे, उपविभागीय अधिकारी वसई.

कांदळवन कत्तल सुरूच

वसई विरार शहरात शासकीय खाजन व पाणथळ जागेतील अतिक्रमण वाढीस लागत आहे. त्यावर असलेले कांदळवनांची वृक्ष त्यांची कत्तल करून त्यावर चाळी तयार करणे, पार्किंग स्थळ तयार करणे अशी कामे सुरूच आहेत. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. विशेषतः कांदळवन भागात असलेली जैवविविधता ही धोक्यात येण्याची भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.

१९ गुन्हे दाखल

कांदळवन क्षेत्रात कत्तल करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम आखली आहे. नायगाव, ससूनवघर, जूचंद्र, शिरगाव, नारिंगी, भुईगाव, अशा विविध ठिकाणच्या भागात कांदळवनाच्या संबंधित १९ गुन्हे दाखल केले आहेत. तर अन्य ठिकाणच्या तक्रारींची चौकशी सुरू आहे असे महसूल विभागाने सांगितले आहे.