नुकतेच १० वी आणि १२ वीचे निकाल लागले. या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. राज्यात २० हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात अनुत्तीर्ण झाल्यामुळे नाही तर चांगले गुण मिळाले नाही किंवा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही म्हणून आत्महत्यांचे प्रमाण जास्त होते. या मुद्द्यावर कुठे चर्चा नाही की गांभिर्याने घेतलेला नाही. या चिमुकल्यांचा आक्रोशच कुणी ऐकनासं झालंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही वर्षांपूर्वी आर आर पाटील हे राज्याचे गृहमंत्री होते. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होऊ लागल्या होत्या. आर आर पाटील यांनी त्याची गंभीर दखल घेतली होती. विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना घरी भेटी दिल्या आणि आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या होत्या. माध्यमांनी देखील हा मुद्दा गांभिर्याने हाताळला होता. मात्र कालांतराने सर्वच मागे पडलं. उपाययोजना कागदावर राहिल्या, माध्यमांनी फारशी दखल घेणं बंद केलं… हे सर्व थांबलं असलं तरी एक गोष्ट कधीच थांबली नाही किंवा कमी झाली नाही ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या. आजही त्या सातत्याने होत आहे. याची नव्याने चर्चा करण्याचे कारण म्हणजे नुकत्याच लागलेल्या १०वी आणि १२ वीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या वाढत्या आत्महत्या.

हेही वाचा…मृत्यूचा बनाव रचून विमा कंपनीकडून उकळले ७० लाख रुपये; डॉक्टरसह चौघाजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

राज्यात २० हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातही सर्वात धक्कादायक बाब म्हणजे केवळ अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या नाहीतर तर अपेक्षेप्रमाणे चांगले गुण मिळाले नाही, किंवा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही अशा चिंतेमुळे नैराश्यग्रस्त होऊन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे सर्वात गंभीर आहे. अपयशामुळे नैराश्य येणं आणि आयुष्य संपवणं हा प्रकार नवा नाही. दरवर्षी निकालानंतर अशा बातम्या कमी अधिक प्रमाणात कानावर येत असतात. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. मात्र आता हे प्रमाण कमालीचं वाढलं आहे. ही आकडेवारी कितीतरी पटीने अधिक असण्याची शक्यता आहे. ज्या नोंदी उपलब्ध आहेत त्यातून ही माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी केवळ शालेय विद्यार्थ्यांची आत्महत्या अशीच नोंद आहे. १५ ते १७ वर्षांच्या विद्यार्थी नैराश्यामुळे आत्महत्या करत असतील तर हे नैराश्य शैक्षणिक अपयशातून आलेले असंत.

या आत्महत्यांची कारणे पाहिलं तर मुले किती तणावात आहेत आणि त्यांच्यावर पालकांकडून अपेक्षांचे किती ओझं लादण्यात आले आहे, त्याची कल्पना येते. भाईदर मध्ये एक विद्यार्थानी १२ वी उत्तीर्ण झाली. तिला ७८ टक्के गुण मिळाले मात्र अपेक्षप्रमाणे अधिक चांगले गुण न मिळाल्याने तिने आत्महत्या केली. ९ मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या दोन विद्यार्थ्यांनी वसईत आत्महत्या केल्या आहेत. चांगल्या करियरची अपेक्षा पालकांकडून मुलांवर लादल्या जात आहेत. त्यातून मग जीवघेण्या स्पर्धांमध्ये विद्यार्थी भरडले जात आहेत. शैक्षणिक अपयश म्हणजे सर्वकाही संपलं अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे कोवळ्या वयातील मुले आपलं जीवन संपवत आहेत.

हेही वाचा…महावितरणाच्या उघड्या डीपी मुळे चिमुकल्याचा मृत्यू

विद्यार्थ्यांना ताणतणावातून मुक्त करून त्यांचे समुपदेश करावे यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने ४१० समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थांना परिक्षापूर्व कालावधी, परीक्षा दरम्यानचा कालावधी तसेच परिक्षेनंतरच्या कालावधीत हे समुपदेशन विनामूल्य उपलब्ध करून दिले जाते. या समुपदेशकांची माहिती शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दिली जाते असा दावाराज्य शैक्षणिक संशोधक व प्रशिक्षण परिषदेने केला आहे. मात्र परिषदेच्या संकेतस्थळावरही याची माहिती सहजी शोधून सापडत नाही. विद्यार्थ्यांपर्यंत अशी माहिती असणे हे तर दूरच. समुपदेशनाचे कार्य हे शाळांमधून व्हायला हवे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांवर आता संवेदनशीलता राहिल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या गंभीर प्रकाराबाबत कुठे चर्चा होत नाही की उपाययोजना होत नाही. सामाजिक कार्यकर्ते महेंद्रकुमार बैसाणे हे गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी आत्महत्या रोखण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी त्यांनी उपोषणासारख्या सनदशीर मार्गाचाही वापर केला. मात्र त्यांच्या पदरी निराशा पडत आली आहे.

हेही वाचा…आरती यादव हत्या प्रकरण : आरोपीच्या कुटुंबियांचा लागला शोध

शासनाच्या उदासनितेमुळे त्यांच्याकडून फार अपेक्षा करण्यात अर्थ नाही. परंतु शाळेतील शिक्षक आणि पालक हेच मुलांना समुपदेशन करून या नैराश्यातून बाहेर काढत असतात. मुले सर्वाधिक काळ शाळेत असतात. अशावेळी शिक्षकांनी मुलांशी संवाद साधून त्यांना जाणीव करून देणे गरजेचे आहे. कमकुवत विद्यार्थी शिक्षकांना आधी समजतो. त्यानुसर त्याच्यावर दबाव न टाकता त्याला इतर पर्यायांची माहिती देऊन त्यात कसं करियर घडविता येईल ते सांगायला हवं. करियरच्या असंख्य असंख्य संधी उपलब्ध आहेत. शैक्षणिक अपयश हे काही अंतिम नाही, हे विद्यार्थ्यांना पटवून द्यायला हवं. त्याअनुषंगाने शिक्षकांची जबाबदारी देखील मोठी ठरते. हल्ली दोन्ही पालक नोकरी करणारे असतात. ते दिवसभर घरात असतात. पालकांनी मुलांशी संवाद ठेवायला हवा. विद्यार्थ्यांचा कल पाहून त्यांच्याकडून अपेक्षा करायला हव्यात. वाढत्या स्पर्धेत मुलांना ढकलून ते विद्यार्थ्यांचे नुकसान करत असतात प्रंसगी ताण सहन न झाल्याने विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असतात. शैक्षणिक अपयशातून विद्यार्थ्यांमध्ये येणारे नैराश्य रोखण आणि त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणं सहज शक्य आहे. त्यासाठी शासन, पालक आणि शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rise in student suicides post exam results sparks need a mental health support and counseling psg