वसईच्या अग्रवाल केंद्रात झुंबड
वसई: परदेशी शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जाणाऱ्यांना कोव्हिशिल्डचा दुसरा डोस २८ दिवसांनी देण्याचा निर्णय महापाालिकेने घेतला आहे. वसईच्या अग्रवाल केंद्रात बुधवारी लशी घेण्यासाठी झुंबड उडाली होती. पहिल्याच दिवशी ४०० जणांना कोव्हिशिल्ड लशीची दुसरी मात्रा देण्यात आली.
वसई विरार शहरातून दरवर्षी शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जात असतात. यंदा करोनामुळे त्यांना लसीकरण बंधनकारक करण्यात आले होते, परंतु १८ ते ४४ वर्षे वयोगटांचे लसीकरण बंद असल्याने या विद्यार्थ्यांची तसेच परदेशी नोकरीला जाणाऱ्यांची कोंडी झाली होती. यामुळे महापालिकेने कोव्हिशिल्ड लशीची दुसरी मात्रा ८४ दिवसांऐवजी २८ दिवसांनी देण्याचा निर्णय घेतला आहे. वसईच्या अग्रवाल केंद्रात परदेशी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, नोकरदार, जहाजावर जाणारे कर्मचारी आणि टोकियो ऑलिंपिकसाठी जाणाऱ्यांना कोव्हिशिल्ड लशीची दुसरी मात्रा देण्यात आली. बुधवारी दुसरी मात्रा घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी झुंबड उडाली होती. अनेकांनी पहाटेपासून कुपन घेण्यासाठी रांगा लावलेल्या होत्या. पहिल्या दिवशी चारशे जणांना लशीची दुसरी मात्रा देण्यात आल्याचे पालिकेने सांगितले. या ठिकाणी गर्दीचे नियोजन करणारी कुठलीही यंत्रणा नव्हती. केवळ एकच कर्मचारी लस देण्यासाठी आणि एकच कर्मचारी नोंदणी करण्यासाठी होते, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली. ज्यांनी कोव्हिशिल्डची पहिली मात्रा घेतली आहे त्यांना दुसरी मात्रा या केंद्रावर मिळणार आहे. नियमामनुसार परदेशी जाणाऱ्या सर्वाना लस दिली जाईल, असे पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी सांगितले.