वसई: वसई पश्चिमेच्या एका इमारतीत सदनिकेचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास हा स्लॅब कोसळला. यात सदनिकेत राहणारे दांपत्य जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वसई पश्चिमेला दीनदयाल परिसर आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास या परिसरातील चाळीस वर्ष जुन्या तिरुपती इमारतीतील बी विंग २०५ या सदनिकेतील हॉलमधील इमारत कोसळल्याची घटना घडली. यावेळी या सदनिकेत राहणारे सलीम विराणी आणि त्यांची पत्नी मेरोनिसा विराणी हॉलमध्ये बसले असताना छतावरील स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेत मेरोनिसा विराणी यांच्या डोक्याला मार लागला तर सलीम विराणी यांच्या खांद्याला दुखापत झाल्याने दोघेही जखमी झाले आहे.त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वसई विरार शहरात सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने जीव मुठीत धरून राहावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
लेखापरीक्षानंतरही आठ वेळा कोसळला स्लॅब
अलीकडेच महापालिकेकडून या इमारतीचे लेखापरीक्षण करण्यात आले होते. त्यानंतर या इमारतीला सीटूबी प्रमाणपत्र देण्यात आले होते. पण, लेखापरीक्षानंतरही इमारतीत तब्बल आठ वेळा स्लॅब कोसळल्याच्या घटना घडल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे वसई विरार शहरातील धोकादायक इमरतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.