वसई: वसई विरार शहराच्या विविध भागात दिवसेंदिवस मोकाट जनावरांचा वावर वाढत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडी, अस्वच्छता अशा विविध समस्यांना सामोरे जावे. तसेच यामुळे अपघात वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पालिकेकडे केलेल्या तक्रारींनंतरही यावर तोडगा न निघत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
वसई विरार मध्ये विविध ठिकाणी तबेले आहेत. या तबेल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरे आहेत. पण गेल्या काही काळात तबेलेवाल्यांच्या निष्काळजीपणामुळे वसई पश्चिमेतील पापडी, स्टेला, माणिकपूर तसेच वसई पूर्वेतील एव्हरशाईन नगर अशा विविध भागात ही जनावरे रस्त्यावर मुक्त संचार करताना दिसून येतात. हे भाग बाजारपेठा, मोठी किराणा दुकाने, शाळा, पेट्रोल पंप आणि मुख्य रस्त्यांनी वसई स्थानकाला जोडलेले असल्याने येथे वाहनांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. पण, गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांच्या वाढत्या वावरामुळे लोकांची डोकेदुखी वाढली आहे.
रहदारीच्या रस्त्यावरून चालणारा जनावरांचा कळप, तसेच कधी थेट रस्त्याच्या मधोमध बसलेल्या जनावरांमुळे अनेकदा वाहनचालकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते.अनेकदा अचानक वाहनासमोर आलेल्या एखाद्या जनावरामुळे, तसेच रस्त्यावर पडलेल्या शेणावरून घसरून वाहनचालकांचा गंभीर अपघात होतो. या अपघातांमध्ये वाहनचालक तर जखमी होतोच. पण, रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांना देखील दुखापत होते. तसेच या मोकाट जनावरांच्या मलमूत्रामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.
महापालिकेची या जनावरांवर कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे वसई विरारच्या विविध परिसरात या मोकाट जनावरांनी उच्छाद मांडायला सुरुवात केली आहे. रोज रोज होणारा त्रास पाहता महापालिकेने या समस्येत लक्ष घालून लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शहरात मोकाट जनावरांची समस्या लक्षात घेता. संबंधित मालकांना नोटिसा पाठवून सूचना केल्या जातील त्यानंतर ही सुधारणा आली नाही तर थेट गुन्हे दाखल केले जातील असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.