वसई: Street name board missing in Vasai वसई विरार शहरातील रस्ते, चौक, गल्ली यांची ओळख पटावी म्हणून महापालिकेकडून लावण्यात आलेल्या नामफलकांची दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणचे नामफलक गायब झाले असून जे नामफलक शिल्लक आहे ते ही तुटलेल्या अवस्थेत आढळून येत आहेत.
वसई विरार शहरात नागरिकांना अचूक ओळख पटावी यासाठी २०२२ साली विविध ठिकाणी नामफलक लावण्यात आले होते. हिरव्या किंवा निळ्या रंगाच्या नामफलकावर पांढऱ्या रंगाच्या अक्षरात संबंधित रस्त्याचे, चौकाचे अथवा परिसराचे नाव स्पष्टपणे लिहिलेले असते. महाराष्ट्रातील नियमांनुसार नामफलकांवर प्रथम मराठी भाषेत आणि त्यानंतर इंग्रजी भाषेत ठिकाणाचे नाव लिहिले जाते. नामफलकांमुळे प्रवाशांना योग्य दिशा शोधणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, पोलीस, अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचणे सुलभ होते. शहरातील भौगोलिक व्यवस्था नीट ठेवण्यास, नोंदी करण्यास आणि प्रशासन कामकाजातही हे फलक महत्त्वाची भूमिका बजावतात.
याशिवाय अनेकदा रस्त्यांना आणि चौकांना सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांची नावं दिली जातात. त्यामुळे नामफलक हे केवळ दिशादर्शक नसून ते शहराच्या संस्कृतीचे, इतिहासाचे आणि परंपरेचे प्रतीक ठरतात. पण गेल्या काही काळात महापालिकेकडून झालेले दुर्लक्ष, नामफलक जुने असल्यामुळे नैसर्गिकरित्या झालेली झीज यामुळे शहरातील बहुतांश ठिकाणचे नामफलक झिजलेल्या, तुटलेल्या अवस्थेत दिसून येतात. तर काही ठिकाणी अतिक्रमणामुळे नामफलक झाकले गेले आहेत तर काही ठिकाणचे नामफलक अक्षरशः गायब झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरात नवे नामफलक बसवण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.
नामफलक नसल्याने नागरिकांची गैरसोय
शहरातील महत्त्वाचे चौक आणि रस्त्यांवरील नामफलकांची दुरावस्था झाल्याने नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नामफलकांअभावी शहरातील प्रवासी, पर्यटक, टपाल वितरक यांना योग्य मार्ग शोधणे कठीण होऊन बसते. तर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, पोलीस व अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होतो.
शहरात ज्या ज्या भागात नामफलक खराब झाले असतील तुटले असतील त्याठिकाणी नव्याने फलक लावले जातील असे पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.
लाखोंचा खर्च वाया २०२२ साली शहरात नामफलक बसवण्यात आले होते. शहरातील ९ प्रभागांचे सर्वेक्षण करून प्रत्येक गल्ली, चौक आणि रस्त्यांवर नामफलक लावण्यात आले. मात्र, सद्यस्थितीत यातले बहुतांश फलक गायब झाले असून उरलेले नामफलकही तुटलेल्या अवस्थेत आढळून येत असल्यामुळे नामफलकांवर करण्यात आलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.