सुहास बिऱ्हाडे
वसई: शहरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून दुसरीकडे लाखो लिटर पाण्याचा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार शहरात तीन हजारांहून अधिक अनधिकृत नळ जोडण्या असल्याची माहिती मिळते. यामुळे शहरात दररोज ३० दशलक्ष लिटर पाण्याचा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. पालिकेने आता या अनधिकृत नळजोडण्या शोधून त्या खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाढती लोकसंख्या, पाण्याची तूट आणि अपुरी वितरण व्यवस्था यामुळे वसई-विरार शहरात पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. पालिकेची सारी भिस्त आता सूर्या पाणी प्रकल्पातून एमएमआरडीएमार्फत मिळणाऱ्या पाण्यावर आहे. मात्र त्यासाठी वर्ष अखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मार्च महिन्यापासूनच शहरात पाणी संकट निर्माण झालेले असून पुढील दोन ते अडीच महिने मोठय़ा कसोटीचे ठरणार आहेत. शहरात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत नळ जोडण्या असून त्यातून पाण्याचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार शहरात ३ हजारांहून अधिक अनधिकृत नळजोडण्या आहेत. अनधिकृत नळ जोडण्या या थेट मुख्य वाहिनीवरून घेतल्या जातात. त्यातील अधिकांश पाणी हे गळतीमुळे वाया जात असते. चुकीच्या पद्धतीने नळ जोडण्या घेतल्या असल्याने वापरकर्त्यांला कमी पाणी मिळते आणि वाया जास्त जात असते. ज्या ठिकाणी अनधिकृत नळजोडण्या आहेत त्या परिसरातील इतर नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळते आणि संपूर्ण वितरण व्यवस्था कोलमडून जात असते.पालिकेने दिलेल्या माहितीनुसार ४ हजारांहून अधिक अनधिकृत नळजोडण्यांमुळे दररोज ३० दशलक्ष लिटर्स पाणी वाया जात असते.
अनधिकृत नळजोडण्या खंडित करणार
पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिकेने अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्याचे ठरवले आहे. काही महिन्यांपूर्वी पालिकेने शहरातील ११९ अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या होत्या. त्यामुळे ९ दशलक्ष लिटर पाण्याची बचत होऊ लागली होती. त्यामुळे शहरातील सर्व अनधिकृत नळजोडण्या तोडण्यासाठी सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते. त्यानुसार शहरात ३ हजारांहून अधिक अनधिकृत नळजोडण्या असल्याचा अंदाज आहे. या अनधिकृत नळजोडण्या तोडल्या तर दररोज ३० दशलक्ष लिटर्स अधिक पाणी मिळू शकणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील यांनी दिली.
दररोज ४३ दशलक्ष लिटर पाण्याची तूट
वसई विरार शहराला सूर्या प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यातून २३० दशलक्ष, पेल्हार धरणातून १० आणि उसगाव धरणातून २० दशलक्ष असा एकूण २३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. शहराला ३२६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना केवळ २२० दशलक्ष लिटर पाणी मिळते. त्यातही पाण्याच्या गळतीचे प्रमाण हे १५ टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना प्रत्यक्षात केवळ १९० दशलक्ष लिटर पाणी मिळते. दररोज ४३ दशलक्ष लिटर पाणी कमी असल्याने नागरिकांना उन्हाळय़ात तीव्र पाणीटंचाईच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
शहरात असलेल्या अनधिकृत नळ जोडण्यांमुळे मोठय़ा प्रमाणावर पाणी वाया जात असते. शहरात ३ हजारांपेक्षा अधिक अनधिकृत नळजोडण्या असून आम्ही त्या शोधून खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दररोज ३० दशलक्ष लिटर अधिक पाणी मिळून नागरिकांना दिलासा मिळू शकणार आहे.-आशीष पाटील, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महापालिका.