वसई: वसई विरार शहरात जलवाहिन्या, रस्त्यांची दुरुस्ती, गॅस वाहिन्या टाकणे, गटार व्यवस्था अशी विविध विकासकामासाठी रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले आहेत. पावसाळ्या पूर्वी याची दुरुस्ती होणे गरजेचे होते. मात्र ते काम न झाल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
वसई विरार शहरात पालिकेकडून विविध ठिकाणी जलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यात आले आहे. त्यासाठी शहरात विविध ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले होते.मात्र त्यानंतर ठेकेदाराकडून संबंधित रस्त्यांची योग्य रित्या दुरुस्ती होणे गरजेचे होते तसे न झाल्याने अनेक ठिकाणचे रस्ते हे केवळ थातूर मातूर पध्दतीने बुजविण्यात आले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
विशेषतः सोपारा- नाळा मार्ग, वाघोली, निर्मळ, नालासोपारा, डी मार्ट लिंक नालासोपारा, पापडी, माणिकपूर, बाभोळा नाका, बंगली रोड अशा बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. विविध विकासकामांसाठी शहरातील रस्ते खोदले होते. मात्र, पालिकेने ही कामे अर्धवट सोडल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर पसरलेली खडी आणि असमान उंचीच्या रस्त्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याचे काँग्रेसचे समीर वर्तक यांनी सांगितले आहे.
तर दुसरीकडे विरार व नालासोपारा भागात ही गॅस वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखल तयार होत आहे. तर दुसरीकडे त्या चिखलात वाहने ही अडकून पडू लागली आहेत. नुकताच विरार चंदनसार येथे महापालिकेची कचरा वाहतूक गाडी या खोदलेल्या रस्त्यात अडकून पडली होती. तर बुधवारी नालासोपारा पूर्वेच्या चंदननाका भागात ही एक डंपर खोदकाम केलेल्या रस्त्यावर अडकून पडले होते. त्यामुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.
अशा खोदकामामुळे नागरिकांना ये-जा करणे अत्यंत कठीण झाले आहे. या खराब रस्त्यांमुळे वाहने अडकून किंवा घसरून अपघात होण्याची भीती निर्माण झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.यासाठी तात्काळ योग्य रित्या त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
महापालिकेकडून विविध ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्तीची कामे पूर्ण केली आहेत. जी बाकी आहेत ती सुद्धा आम्ही पाऊस थांबला की पूर्ण करीत आहोत. तर काही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. त्यांच्याशी पत्रव्यवहार करून ती कामे पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. – प्रदीप पाचंगे, प्रभारी शहरअभियंता महापालिका
विरार रस्त्यावर गॅस वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केले होते. त्या दुरुस्तीचे कामाची सुरुवात केली आहे. पावसामुळे कामात अडचणी येत आहेत. पावसाने उसंत दिली ही कामे पूर्ण करवून घेऊ. – संजय यादव, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वसई.