वसई म्हटले की, हिरवागार निसर्ग, फळबागा, विस्तीर्ण समुद्रकिनारा, डोंगररांगा, बावखले, सुंदर तलाव असे चित्र समोर येते. निसर्गाच्या समृद्धीने वसईची हरित वसई म्हणून ओळख निर्माण झाली आहे. नागरिकांना शुद्ध आणि ताजी हवा पुरविणारा हा हरितपट्टा म्हणजे हिरवी श्वसनयंत्रणाच आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून वसईचा हरितपट्टा ओरबाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मागील काही वर्षांत वाढती विकासकामे, नव्याने तयार होत असलेले प्रकल्प, बुजविण्यात येत असलेले जलस्रोत, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र टिकविण्यासाठी होत असलेले दुर्लक्ष, चटई निर्देशांक क्षेत्रात करण्यात आलेली वाढ, वाढते प्रदूषण, अतिक्रमण, बेसुमार वाळू उपसा, पाणी जाण्याचे नैसर्गिक बंद झालेले मार्ग, धूपप्रतिबंधक बंधारे तयार करण्याकडे होत असलेले दुर्लक्ष अशा विविध कारणांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे.
हेही वाचा – मिरा भाईंदर मध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक चाकू हल्ला; खासगी रुग्णालयात उपचार सुरू
वसई-विरार शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. अर्नाळा, नवापूर, भुईगाव, राजोडी, सुरुची, कळंब, रानगाव हे किनारे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने पर्यटक येऊन या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. विशेषत: मागील काही वर्षांपूर्वी या किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात सुरुच्या झाडांची लागवड करून वनराई तयार करण्यात आली होती. अगदी एकापाठोपाठ एक अशा प्रकारे झाडे असल्याने खऱ्या अर्थाने ही सुरूची झाडे समुद्र किनाऱ्यांची शान बनली होती.
परंतु त्या सुरूच्या झाडांचे वेळोवेळी संवर्धन न झाल्याने आज किनारपट्टीवर फेरफटका मारल्यास हजारोच्या संख्येने झाडे उन्मळू नष्ट झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. ती नष्ट होत आहेत की नष्ट केली जात आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे. ती नष्ट होण्यामागे विविध कारणे आहेत. मागील काही वर्षांपासून वसई-विरारमधील समुद्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा सुरूच आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात किनारपट्टीची धूप होऊ लागली आहे. त्याचाच परिणाम हा सुरूच्या झाडांच्या मुळांवरही झाला आहे. वाळू उपसा रोखण्यासाठी शासन स्तरावरून उपाययोजना केल्या जात नाहीत. केवळ एक ते दोन कारवाया होतात. मात्र पुन्हा जैसे थे प्रकार सुरूच असतात. तर काही छुप्या मार्गाने सुरूच्या झाडांची कत्तल करतात. यातून किनारपट्टीच्या भागाचे संरक्षण होईल का, हा विचार होणे गरजेचे आहे.
दुसरीकडे समुद्र किनारपट्टीची धूप रोखण्यासाठी व किनाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी कोकण आपत्ती व्यवस्थापन प्रकल्पाच्या अंतर्गत धूपप्रतिबंधक बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. मात्र त्यांच्या कामाला गती मिळत नाही. बंधारे तयार केले आहेत तेसुद्धा अपुरेच आहेत. त्यामुळे अनेक समुद्र किनारे हे धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांविनाच आहेत. वेळीच आवश्यक त्या उपाययोजना करण्याकडे होत असलेले दुर्लक्ष याचाच हा परिणाम सुरूच्या बागांवर झाला आहे.
समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने थेट लाटा किनाऱ्याला धडकत आहेत. यात सुरूच्या झाडांच्या मुळाखालील मातीची धूप होऊन झाडे कोसळून पडत आहेत. दरवर्षी वसई-विरारमधील समुद्र किनारी हजारोंच्या संख्येने सुरूची झाडे कोसळून नष्ट होत आहेत. सुरूच्या झाडांचे संरक्षण होण्यासाठी सुरक्षा बंधारा तयार करण्यात यावा अशी मागणी नागरिक करीत आहेत. परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने समुद्र किनाऱ्यांची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे.
हेही वाचा – वसई : वाढवण बंदराच्या विरोधात भाजप नेत्याच्या दुटप्पी भूमिकेमुळे मच्छीमारांमध्ये संभ्रम
सुरूची झाडे नष्ट झाली तर हळूहळू वाळवंट तयार होईल, यामुळे याचा परिणाम हा पर्यटनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उरलीसुरली सुरूची झाडे वाचविण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन किनाऱ्यांची धूप कशी थांबवता येईल यावर उपाययोजना होणे काळाची गरज निर्माण झाली आहे.
पक्ष्यांचा अधिवास धोक्यात
वसई तालुक्यातील समुद्र किनारे पर्यटक, पक्षीप्रेमींसाठी खूप प्रसिद्ध आहेत. तसेच किनाऱ्यालगत विविध पशुपक्षी आश्रयाला येत असल्याने सागरी जिवावर अभ्यास करणारे संशोधक वसई-विरारमधील समुद्र किनाऱ्यावर येत असतात. मात्र येथील सुरूच्या बागांचे निसर्गसौंदर्य नष्ट होत असल्याने पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. दुसरीकडे सुरूची झाडे दिवसेंदिवस कमी होत असल्याने समुद्राचे पाणी थेट किनाऱ्यालगत असलेल्या शेतात घुसू लागले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. पाणी शेतात येत असल्याने शेतीच्या मातीमधील पूर्णत: कस निघून जाऊन येथील विविध प्रकारची शेती धोक्यात आली आहे.