वसई : मागील दोन महिन्यांपासून मच्छीमारांनी आपल्या बोटी समुद्र किनारी नांगरून ठेवल्या होत्या. १ ऑगस्टपासून मासेमारीच्या हंगामाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर बोटी सज्ज करण्यासाठी मच्छिमार बांधवांची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वसई पश्चिमेतील अर्नाळा, वसई, नायगाव, पाचूबंदर, किल्लाबंदर या भागातील मोठ्या संख्येने कोळी बांधव मासेमारीचा व्यवसाय करतात. यासाठी मच्छीमार बांधव आपल्या बोटी खोल समुद्रात मासेमारीसाठी घेऊन जात असतात. त्याठिकाणी जाऊन १५ दिवस, एक महिना राहून मासेमारी केली जाते. दरवर्षी ऑगस्ट – सप्टेंबर महिन्यापासून या मच्छीमारांच्या बोटी या मासेमारी जातात व जवळपास ८ ते १० महिन्यांच्या कालावधीमध्ये ही मासेमारी चालते. यासाठी वसईतील मच्छिमारांची मासेमारी करण्यासाठी लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून आले आहे.
मासेमारीसाठी जाण्यासाठी योग्य ती बोटींची डागडुजी, मासेमारी केल्यानंतर लागणारा बर्फ, विणलेली जाळी, बोटीसाठी लागणारे इंधन, जीवनावश्यक वस्तूंची जमवाजमाव आदि कामे हाती घेण्यात आली असून सर्व साहित्य बोटीत नेऊन ठेवण्यात येत असल्याचे मच्छिमार बांधवांनी सांगितले आहे.
तर मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटींना मत्स्यव्यवसाय विभागाकडून अधिकृत परवाना देण्यात येतो. तीन वर्षांनंतर त्याचे नूतनीकरण केले जाते. त्यांची कामे सुरू असल्याचे परवाना अधिकारी विनोद लहारे यांनी सांगितले आहे.
यंदाच्या हंगामात चांगल्या मासेमारीची आशा
मागील काही वर्षांपासून सातत्याने बदलणारे निसर्गचक्र, दूषित समुद्र किनारे, वादळी वारे, मासेमारी बोटींची वाढती संख्या, बंदी कालावधीत होणारी बेसुमार मासेमारी, ओएनजीसी सर्वेक्षण अशा विविध प्रकारच्या अडचणींमुळे मच्छीमार बांधव संकटात सापडत आहे. यावर्षीच्या मासेमारीचा हंगामात सुरू होऊ लागला आहे. त्यामुळे यावर्षी तरी चांगल्या प्रकारची मासेमारी होईल या आशेवर हे सर्व बांधव कामाला लागले आहेत.