वसई : शहरातील प्रदूषण कमी करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र शासनाकडून पालिकेला ७२ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून पुढील तीन महिन्यांत प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणार आहे. त्यामध्ये फवारे कारंजे, मियावाकी उद्यान, गॅसदाहिन्या, दुभाजक उद्यान तसेच रस्त्याच्या कडेचे डांबरीकरण करणार आहे. सोमवारी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत पालिकेने या उपाययोजनांचे सादरीकरण केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत शहरातील प्रदूषण रोखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र शासनाने विविध उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिकांना दिले आहेत. त्यानुसार महापालिकांना निधी उपलब्ध करून दिला जात आहे. आतापर्यंत वसई विरार महापालिकेला ७२ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यानुसार पालिकेने कामांना सुरुवात केली आहे. आतापर्यंत केलेल्या कामांचे सादरीकरण आणि नियोजित कामांची माहिती सोमवारी दिल्ली येथे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालयाने आयोजित बैठकीत देण्यात आली.

याअंतर्गत पालिकेने ६ ठिकाणी फवारे असलेले कारंजे लावले आहेत. मार्चअखेपर्यंत १४ ठिकाणी अशा प्रकारची कारंजी बसविण्यात येणार आहेत. यामुळे पाण्यामुळे परिसरातील धूळ कमी होऊन थंडावा राहण्यास मदत होणार आहे. याशिवाय हवा शुद्धीकरणाची यंत्रे  बसविण्यात येणार आहेत.  जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून मियावाकी उद्याने तयार केली जात आहेत.  कौल सिटी आणि पाचूबंदर येथे तीन उद्यानांचे काम सुरू असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त आणि स्वच्छ हवा कार्यक्रमाचे नोडल अधिकारी किशोर गवस यांनी दिली.

दुभाजक उद्यान तयार करणार

पालिकेने दुभाजक उद्यान तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यांच्या मध्ये असलेल्या जागेचे सुशोभीकरण करून तेथे शोभिवंत झाडे लावून हे उद्यान तयार केले जाणार आहे. त्यासाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद  आहे. रस्त्याच्या कडेला असलेली धूळ, मातीचे प्रदूषण रोखण्यासाठी त्या ठिकाणी डांबरीकरण केले जाणार आहे. यामुळे रस्त्यालगतचा परिसर स्वच्छ आणि धूळीचे प्रदूषण कमी होईल, असा विश्वास पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी व्यक्त केला. रस्ता स्वच्छ करण्याचे स्वयंचलित वाहन खरेदी केले होते. दिल्ली येथे झालेल्या महापालिकांच्या बैठकीत  वाहनाचे सादरीकरण करण्यात आले. आता आणखी एक स्वयंचलित यंत्र विकत घेण्याचा निर्णय घेतला असून त्याची किंमत सव्वा कोटी रुपये आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून केंद्राकडून टप्प्याटप्प्याने निधी मिळत आहे. त्यानुसार आम्ही विविध कामांना सुरुवात केली असून मार्चपर्यंत पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण केली जाणार आहेत.  – अनिलकुमार पवार,आयुक्त, वसई विरार महापालिका

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai get 72 crore fund to fight pollution zws