वसई : अन्नधान्य पुरवठा विभागाने शिधापत्रिकेची प्रक्रिया संगणकीकृत करून ऑनलाइन शिधापत्रिका देण्यास सुरुवात केली आहे. या ऑनलाइन स्वरूपातील शिधा पत्रिका वितरणाला वसईच्या पुरवठा विभागाने गती दिली असून आतापर्यंत ४ हजार ७२० इतक्या शिधापत्रिका ऑनलाइन दिल्या आहेत
वसई विरार मध्ये नवीन शिधापत्रिका काढणे, नावे चढविणे, कमी करणे, विभक्त करणे अशा विविध कामासाठी नागरिकांना सेतू कार्यालयात येत असतात. काही वेळा दिलेल्या मुदतीत शिधापत्रिका धारकांना मिळत नाही. त्यामुळे नागरिकांची शिधापत्रिका मिळविण्यासाठी परवड होत असते. यासाठी आता शिधापत्रिका ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यावर पुरवठा विभागाने भर दिला आहे. यासाठी शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली द्वारे शिधापत्रिका काढणे, शिधापत्रिकेमधील नावांची दुरुस्ती करणे, शिधापत्रिकेतील पत्ता बदलणे आदी कामे आता ऑनलाइन स्वरूपात केली जात आहेत.
आतापर्यंत वसईच्या पुरवठा विभागाने ४ हजार ७२० इतक्या शिधापत्रिका ऑनलाइन दिल्या आहेत. यात अंत्योदय १, शुभ्र १५, प्राधान्य कुटुंब लाभार्थी ७८५, एनपीएच ३ हजार ९१९ अशा शिधापत्रिकांचा समावेश आहे. या शिधापत्रिकांमुळे शासनाच्या विविध योजना, वैद्यकीय उपचार यासह विविध योजनांचा लाभ घेण्यास ही मदत होणार असल्याचे पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी सांगितले आहे. याशिवाय जे लाभार्थी आहेत त्यांना ही वेळोवेळी धान्याचा लाभ दिला जात असल्याचा दावा सोनार यांनी केला आहे.
संकेतस्थळ धीम्या गतीने
ऑनलाइन संकेतस्थळ अतिशय धीम्या गतीने सुरू सुरू आहे. त्यामुळे शिधापत्रिकांची ऑनलाइन होणारी कामे रखडत होती.दिवसाला वसईच्या पुरवठा विभागात शिधापत्रिकेच्या संबंधित पन्नासहून अधिक अर्ज येत असतात. मात्र संकेतस्थळ अगदी धीम्या गतीने सुरू असल्याने कामकाजात अडचणी येत असतात. त्यामुळे रात्रीच्या सुमारास बसून अशी ऑनलाइनचे कामे करावी लागत असल्याचे पुरवठा विभागाने सांगितले आहे.
ऑनलाइन शिधापत्रिकांसाठी आमच्याकडे अर्ज येतात. विहित वेळेत ते काम पूर्ण करून देण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत नागरिकांना चार हजारापेक्षा अधिक शिधापत्रिका तयार करून वितरित केल्या आहेत. :- भागवत सोनार, पुरवठा अधिकारी वसई.