वसई : वसईच्या उपविभागीय कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर विविध ठिकाणी मोठं मोठे खड्डे तयार झाले आहेत.त्यामुळे या रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली असून नागरिकांना येथून ये जा करण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या आहे.वसई पश्चिमेच्या भागात उपविभागीय कार्यालय आहे. या कार्यालयात वसई तालुक्यातून विविध जमीन मिळकती दावे व अन्य शासकीय कामांकरिता नागरिक या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी दररोज येणाऱ्यांची संख्या शेकडोमध्ये आहे.

पाटकर रेसिडेन्सी ते शासकीय विश्रामगृहाच्या कुंपणा पर्यंतचा हा संपूर्ण रस्ता सध्या धोकादायक स्थितीत आहे. पाचुबंदर येथे जाण्यासाठी अवजड वाहनांना हा रस्ता वापरला जातो. शिवाय वसई आरटीओ विभागाच्या आठवडा कॅम्प साठीही याच रस्त्याचा वापर केला जातो. त्यामुळे दिवसभर वर्दळ असलेल्या या रस्त्याची मागील काही महिन्यात पावसामुळे दयनीय अवस्था झालेली आहे. दिवसेंदिवस खड्डे अधिकच वाढत असून त्यात पावसाचे पाणी साचून राहिले आहे.त्यामुळे येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना काही वेळा या साचलेल्या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे.
अशी स्थिती असताना देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांना होणारा त्रास लक्षात तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

सदरची जागा व रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढून नवीन न्यायालया साठी देण्यात आली आहे.त्यामुळे सदर रस्त्याच्या डागडुजीचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महापालिका व जिल्हा परिषदेमार्फत याची दुरुस्ती करण्याच्या संदर्भात कळविले असल्याचे उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.