वसई : नागरिकांच्या ऑनलाइन तक्रारींना निलंबित नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या नावाने उत्तरे दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घोटाळ्याप्रकरणी रेड्डी सध्या तुरुंगात असून पालिकेने त्यांना ५ महिन्यांपूर्वीच निलंबित केले आहे. तरी देखील रेड्डी यांच्या नावाने नागरिकांना ऑनलाइन पोर्टलद्वारे उत्तरे जात असल्याने रेड्डी पालिकेत सक्रीय असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पालिकेच्या अशा कारभारावर नागरिकांमधून जोरदार टीका केली जात आहे.

नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारत प्रकरणात नगररचना विभागाचे उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांचा सहभाग आढळला होता. मे महिन्यात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉंड्रींग कायद्याअन्वये भूमाफियांसह रेड्डी यांच्या हैद्राबाद येथील घरावर छापा टाकून ३० कोटींचे घबाड जप्त केले होते. त्यानंतर पालिकेकडून रेड्डी यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. १३ ऑगस्ट रोजी रेड्डी, तसेच तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार यांनी ईडीने अटक केली होती. तेव्हापासून ते तुरूंगात आहेत. तरी देखील नागरिक ज्या ऑनलाइन पोर्टलद्वारे तक्रारी करतात त्यांना रेड्डी यांच्या नावाने दिली जात असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.

नुकताच बांधकाम विकासक ज्या निळ्या रंगाचे फलक लावतात ते मराठीतच हवेत अशी तक्रार मराठी एकीकरण समितीचे प्रसन्न जंगम यांनी आपले सरकार पोर्टलवर केली होती. त्या तक्रार निवारण करण्यासाठी शासनस्तरावरून पालिकेकडे पाठविण्यात आली होती. त्या तक्रारीला पालिकेने २९ सप्टेंबर २०२५ रोजी युडीसीपीआर२०२० च्या कलमानुसार माहितीफलकासंबंधी उत्तर देण्यात आले. मात्र देण्यात आलेले उत्तर ईडीच्या कारवाईत निलंबित असलेल्या वाय एस रेड्डी यांच्या नावाने दिले असल्याचा प्रकार समोर आला आहे.

रेड्डीना ईडीने अटक केली असून ते तुरुंगात आहेत. तुरुंगात असलेला अधिकारी तक्रारींना उत्तर कसा देऊ शकतो? पालिका खरोखर तपासणी करते की फक्त नावे वापरून दिशाभूल केली जाते? असा सवाल एकीकरण समितीने केला आहे. या प्रकारामुळे पालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे.

ऑनलाइन पोर्टलद्वारे अशा प्रकारे उत्तरे जात असतील ते चुकीचे आहे. याबाबत नगररचना विभागाला सूचना देऊन ते नाव तातडीने बदलून घेण्यास सांगण्यात येईल असे महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.