वसई : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वसई विरार शहरातील राजकीय वातावरण बोचऱ्या थंडीतही चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीची मोर्चेबांधणी करीत आहेत .दरम्यान, विरार येथे पालकमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबाराचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले असता भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या संधीचा फायदा घेतला. जनता दरबाराच्या निमित्ताने नाईक हे शहरात येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात स्वागत फलक व भाजपचे ध्वज लावण्यात आले . तसेच जनता दरबाराच्या ठिकाणी सुद्धा भाजप पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती असल्याने जनता दरबाराला सुद्धा भाजप मेळाव्याचे स्वरूप आल्याचे चित्र होते. एकंदरीतच या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजप नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विकासकामांचे उद्घाटन, विविध पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचे सुरू असणारे पक्षप्रवेश यांच्या माध्यमातून भाजप पक्षाने वसई विरारमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे स्थान अढळ करण्यासाठी राज्यस्तरीय नेत्यांचे दौरे ही शहरात सुरू झाले आहेत.

पक्षसंघटना मजबूत करणे आणि नागरिकांशी थेट संपर्क वाढवणे या उद्देशाने भाजपने विशेष रणनीती आखली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षातील वरिष्ठ नेते तथा मंत्री शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत जनता दरबार आयोजित करत आहेत.

शिवसेना (शिंदे गट) नेते व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या जनता दरबारानंतर शहरात पहिल्यांदाच वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार शुक्रवारी विरार येथे पार पडला. जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक, मुख्य रस्ते व ज्या मार्गाने त्यांचा ताफा जाणार आहे. अशा सर्वच ठिकाणी भाजप कार्यकर्ते व पुढाऱ्यांकडून जागोजागी स्वागत फलक व भाजपचे मोठ्या प्रमाणात ध्वज लावण्यात आल्याचे चित्र दिसून आले.

नाईकांच्या दरबारात तक्रारींचा पाऊस

पालकमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबारात समस्या मांडण्यासाठी वसई विरारच्या विविध भागातून नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी तीनशेहून अधिक नागरीकांनी आपल्या समस्या मांडल्या. यात अवैध रिक्षाथांबे, बेकायदा मातीभराव, अपंगांचे प्रश्न, २०१७ पासून प्रलंबित असणारे परवाने, रस्त्यांची दुरुस्ती, पाणी प्रश्न, कांदळवनांचा ऱ्हास, पाणथळ जागांचा प्रश्न, कामण जिल्हापरिषद शाळेत शिक्षकांची कमतरता, स्मशानभूमींचे नूतनीकरण, नायगाव रेल्वे स्थानकालगतचे अनधिकृत पार्किंग, उद्यानांमधील निकृष्ट दर्जाची खेळणी, धूपप्रतिबंधक बंधारे अशा विविध समस्या जनता दरबारात प्रामुख्याने मांडण्यात आल्या.

इच्छुक उमेदवारांची जनता दरबारात गर्दी

शुक्रवारी विरारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात सामान्य नागरिकांसह भाजप नेते, कार्यकर्ते यांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पण, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमळाच्या चिन्हाचा बॅच लावून आणि गळ्यात भगवे वस्त्र घालून व्यासपीठावर भाजपच्या भावी नगरसेवकांनी केलेल्या गर्दीमुळे जनता दरबाराला कार्यकर्ता मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

विकासकामांना मिळणार गती

विरार येथे आयोजित जनता दरबारात येण्यापूर्वी आम्ही आचोळे येथे प्रस्तावित रुग्णालय, क्रीडानगरी, मजेठिया नाट्यगृह अशा विविध प्रलंबित प्रकल्पांची पाहणी केली आहे. तसेच शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, वसई विरार शहराला अंतर्गत जोडणाऱ्या उड्डाणपुलांचे काम पूर्ण व्हावे म्हणून शासनस्तरावर आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे शहरातील रखडलेले प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली. तसेच शासकीय अधिकारी नाहीत म्हणून लोकप्रतिनिधींनी जनतेला भेटू नये, असे काही नाही, असे वक्तव्य ही त्यांनी यावेळी केले.