वसई : वसई विरार महापालिकेने शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याचे विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नव्याने प्रकल्प हाती घेतले असून त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने नव्याने कंत्राट काढले आहे. महापालिकेने घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत काढलेले याआधीचे साडे तीनशे कोटींचे कंत्राट पालिकेने रद्द करत नव्याने ९ प्रभागांसाठी स्वतंत्रपणे कंत्राट काढले आहे. नव्याने काढण्यात आलेले कंत्राट सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षासाठी असून या कंत्राटासाठी एकूण ५६ निविदा महापालिकेकडे आल्या असून या निविदांची तांत्रिक सल्लागाराकडून पडताळणी सुरू करण्यात आली आहे. विशेषतः लहान कंत्राटदारांना देखील यामध्ये सहभागी होता यावे यासाठी स्वातंत्र निविदा काढण्यात आल्या आहेत.

वसई – विरार शहराची लोकसंख्या वाढत असताना दुसरीकडे कचऱ्याची समस्या देखील वाढलेली आहे. शहरात सध्या कचऱ्याची समस्या बिकट झाली असून जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. तसेच कचराभूमीवरील कचऱ्याचे ढीग देखील वाढत असून कचरा नाल्यांमध्ये देखील दिसून येत आहे. या सर्वांवर उपाययोजना म्हणून पालिकेने कचऱ्याचे विविध प्रकल्प हाती घेत कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत कचऱ्यासाठी जुने काढलेले कंत्राट आणि त्याची निविदा प्रक्रिया रद्द करत नऊ प्रभागांसाठी ९ स्वतंत्र अशा नव्याने निविदा काढल्या आहेत. शहराची साफसफाई करण्यासाठी घनकचरा विभागाअंतर्गत कंत्राट काढले जाते.

महापालिकेने दैनंदिन सफाई, चैंबर सफाई करणे, घरोघरी जाऊन कचरा उचलणे आणि तो कचराभूमीत नेण्याच्या कामासाठी कंत्राट काढले होते. हे कंत्राट २०२५-२६, २०२६-२७ आणि २०२७-२८ अशा एकूण ३ वर्षांसाठी होते. एकूण कंत्राट ३०० कोटींचा होते. यासाठी २३ एप्रिल २०२४ रोजी प्रशासकीय ठराव घेऊन मान्यता घेण्यात आली होती. ११ ऑक्टोबर २०२४ मध्ये निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र या एकत्रित तीनशे कोटींच्या निविदेमुळे लहान कंत्राटदारांना या निविदा प्रक्रियेत भाग घेता येत नव्हता. तसेच सर्व प्रभागांची योग्य पद्धतीने स्वच्छता व्हावी यासाठी पालिकेने ९ प्रभागाची स्वतंत्र निविदा काढण्याचा निर्णय पालिकेने घेत त्यानुसार महापालिकेने पुन्हा तीन वर्षांसाठीच या कामांची निविदा काढली आहे.

सद्यस्थितीत या निविदा प्रक्रियेमध्ये आलेल्या पहिला लिफाफा उघडला असून त्यामध्ये एकूण ५६ कंत्राटदारांनी निविदा भरल्या आहेत. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पालिकेच्या कंत्राटासाठी स्पर्धा दिसून आली आहे. जास्त निविदा आल्यामुळे तांत्रिक सल्लागार असलेल्या कंपनीमार्फत तांत्रिक पडताळणी करण्याचे काम सध्या सुरु असल्याचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले आहे. त्यामुळे सध्या अंतिम टप्प्यात ही निविदा प्रक्रिया असून पालिका हद्दीत यामुळे योग्य नियोजन होणार असल्याचा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.

राजकीय पक्षाच्या कंपनीचा सहभाग वसई विरार महानगरपालिकेने एकाच कंत्राटदाराकडे असलेले हे कंत्राट आता नऊ वेगवेळ्या कंत्राटाकडे देण्यात येणार असल्याने एकाच कंत्राटदारावरील ताण कमी होणार आहे. तसेच या कंत्राटासाठी एकूण ११ कंपन्यांच्या ५६ कंत्राटदारांनी यामध्ये निविदा भरल्या असून यामुळे नव्याने कंत्राटदारांना संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे पालिकेकडे प्राप्त झालेल्या ५६ निविदांपैकी सर्वाधिक निविदा या एका राजकीय पक्षाच्या कंपनीने सर्वाधिक निविदा आहेत.

परराज्यातील कंपन्याही स्पर्धेत

घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटासाठी असलेल्या निविदा प्रक्रियेत यावेळी प्रथमच जास्त कंपन्यांनी भाग घेतला आहे. तसेच तामिळनाडू ,मध्यप्रदेश अशा परराज्यातील कंपन्यांनी सुद्धा या प्रक्रियेत पहिल्यांदाच भाग घेतला आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटासाठी स्पर्धा वाढलेली आहे. त्याचप्रमाणे परराज्यातील कंपन्यांच्या सहभागामुळे प्रस्थापित कंत्राटदारांसह महापालिका प्रशासनाला सुद्धा यावेळीच्या निविदा प्रक्रियेत वेगळा असा अनुभव येण्याची शक्यता आहे.