वसई: मागील पाच वर्षांपेक्षा जास्त व लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकीत ठेवला आहे. अशा मालमत्ता धारकांच्या कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबवून कर वसूल केला जाणार आहे. जे कर भरणा करण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली जाईल असा इशारा पालिकेने दिला आहे.

वसई विरार महापालिका हद्दीत १० लाख १६ हजार एवढ्या मालमत्ता आहेत. त्यात  छोट्या मोठ्या औद्योगिक वसाहती, उपहारगृहे, इमारती, सदनिका आदींचा समावेश आहे. या मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. मागील आर्थिक वर्षात पालिकेने ३९२ कोटी ५५ लाख रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर वसूल केला होता. यंदाच्या आर्थिक वर्षात पालिकेने ५०० कोटी रुपये मालमत्ता कर गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याच अनुषंगाने कर संकलन विभागाने एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून कर संकलन करण्यावर भर दिला आहे. जुने मालमत्ता थकबाकीदार यांना देयके वितरण करण्यास सुरुवात केली होती.

विशेषतः आता मागील पाच वर्षांपासून कर भरणा केला नाही याशिवाय ज्यांच्या कराची रक्कम ही लाखो रुपयांचा घरात आहे. अशा मालमत्ता धारकांचा कर वसूल करण्यासाठी पालिकेकडून मोहीम हाती घेतली जाणार आहे. नऊ प्रभागात पथके नियुक्त करून ही मोहीम चालविली जाणार आहे. सुरवातीला कर भरणा करण्याचे आवाहन केले जाईल. मात्र त्यानंतर कर भरणा करण्यास नकार दिला तर त्यांच्यावर कायदेशीर मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाईल असे मालमत्ता कर संकलन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

चार महिन्यात १७० कोटींचा कर वसूल

मालमत्ता कर वसूल करण्यासाठी विशिष्ट कालावधीमध्ये कर भरणा केल्यास मालमत्ता धारकांना विशेष सवलती सुद्धा पालिकेने जाहीर केल्या होत्या. यात १ एप्रिल ते ३० जून २०२४ या कालावधीत कर भरणा केला तर ५ टक्के सामान्य करात सूट तर १ ते ३१ जुलै या दरम्यान कर भरणा केल्यास ३ टक्के इतकी सवलत दिली होती. आतापर्यंत चार महिन्यात मालमत्ता कर संकलन विभागाने १७० कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. शहरात सर्वाधिक रक्कमेचे थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडून मालमत्ता कर वसुल करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

जे कर भरणा करण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल. – दीपक झिंजाड, उपायुक्त ( मालमत्ता कर संकलन)