वसई: वसई विरार महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.जास्तीत जास्त शाडूच्या मातीच्या मूर्ती बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी महापालिकेमार्फत मूर्तीकारांना शाडूची माती उपलब्ध करून दिली जाणार आहे. यावर्षी पालिकेने १ हजार गोणी शाडू माती मागविली असून ती मूर्तिकारांच्या मागणीनुसार मोफत वितरित केली जाणार आहे.
वसई विरार शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. मागील काही वर्षांपासून घरगुती व सार्वजनिक अशा गणेशाची संख्या वाढली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे जलस्त्रोत प्रदूषित होऊन पर्यावरणाला धोका निर्माण होतो. त्यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाच्या संरक्षणासोबतच शाश्वत पद्धतीने पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर पालिकेने भर दिला आहे.
यासाठी जास्तीत जास्त मूर्तिकारांनी शाडू मातीचे गणपती तयार करावे यासाठी आता महापालिकेने पुढाकार घेतला आहे. मागील महिनाभरापूर्वी पार पडलेल्या बैठकीत मूर्तिकारांना शाडू माती उपलब्ध करून देण्याची घोषणा महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी केली होती. त्याच अनुषंगाने आता मूर्तिकारांना शाडू माती उपलब्ध करून दिली जाणार आहे. सद्यस्थितीत महापालिकेने १ हजार शाडू मातीच्या गोणी मागविल्या आहेत एक गोणीत ४० किलो इतकी शाडू माती असणार आहे. या मातीसाठी महापालिकेने जवळपास दोन लाख रुपये इतका निधी खर्च केला आहे.
मात्र ही माती मूर्तिकारांना पालिकेकडून मोफत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे महापालिका उपायुक्त अजित मुठे यांनी सांगितले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी ही शाडू मातीच्या मूर्त्यांचा वापर करावा असे आवाहन ही पालिकेकडून करण्यात येत आहे.
शाडूमाती मुळे पर्यावरण रक्षण
गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ परीसच्या मूर्तींमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी पर्यावरण पूरक गणेशमूर्तीचा पर्याय समोर आला आहे. शाडू मातीच्या मूर्त्यांची निर्मिती व्हावी यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. पीओपीच्या मूर्ती तलावात विसर्जन केल्यानंतर त्याचे विघटन लवकर होत नाही. मात्र मातीची मूर्ती असेल तर त्याचे विघटन पण लवकर होते. याशिवाय जर गणेश मूर्त्यांचे छोट्या हौदात केले तर जमा झालेल्या मातीचा पुनर्वापर पण करता येऊ शकतो असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा त्या दृष्टीने पालिका उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मूर्तिकारांना शाडू माती उपलब्ध करून दिली जात आहे. – अजित मुठे, उपआयुक्त वसई विरार महापालिका