वसई : वसई विरार महापालिकेने अनधिकृत बांधकामावरील कारवाई अधिकच तीव्र केली आहे. अवघ्या आठवडा भरातच नऊ प्रभाग पालिकेने अडीच लाख चौरस फुटाहून अधिक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. वसई विरार शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारली जात आहेत. हीच अनधिकृत बांधकामे नागरिकांच्या जीवावर बेतू लागली आहेत. काही दिवसांपूर्वी विरार पूर्वेच्या विजयनगर येथे अनधिकृत धोकादायक इमारत कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला होता.वसई, नालासोपारा या भागातही इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या तसेच इमारत कलंडण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न निर्माण झाला होता.

या घटनेनंतर शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा विविध स्तरातून उपस्थित करण्यात आला होता अखेर महापालिकेने शहरातील तयार होत असलेली अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यासाठी विशेष मोहीम आखली आहे. त्यानुसार ९ सप्टेंबर पासून शहरातील अनधिकृत आणि अतिधोकादायक बांधकामांविरोधात महापालिकेकडून नियुक्त करण्यात आलेल्या पथकांद्वारे कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मागील आठवडा भराच्या कालावधी पेल्हार, विरार, माणिकपूर, कामण चिंचोटी, सातीवली, भोयदापाडा, कण्हेर फाटा, नालासोपारा यासह विवीध ठिकाणच्या भागात सुमारे २ लाख ६१ हजार ५९६ इतके अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांनी दिली आहे. .अजूनही विविध ठिकाणी कारवाया सुरूच आहेत असेही त्यांनी सांगितले आहे.

पथकात होणार वाढ

वसई विरार महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी १० पथके नियुक्त करण्यात आली आहेत. यात अजून ५ पथकांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच कारवाईसाठी वापरण्यात येणारे जेसीबींच्या संख्येतही वाढ करण्यात येणार असून पोलीस बंदोबस्तासह जास्तीत जास्त अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी दिली आहे.