वसई : वसईतील नरवीर चिमाजी आप्पा मैदानालगतच्या फूटपाथवरील खाऊ गल्लीवर पालिकेने कारवाई केली होती. आता तेथील फेरीवाले हे मैदानाच्या काही भागात बसविले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.त्यामुळे क्रीडाप्रेमींनी आधीच या मैदानात खाऊगल्ली उभारू नये यासाठी विरोध दर्शविला आहे.

वसई पश्चिमेच्या भागात नरवीर चिमाजी अप्पा मैदान आहे. या मैदानात विविध प्रकारच्या स्पर्धा, महोत्सव असे कार्यक्रम पार पडतात. या मैदानाला लागून असलेल्या नाल्यावर खाऊगल्ली उभारण्यात आली होती. मात्र या नाल्यावर असलेला स्लॅब धोकादायक बनल्याने तेथील खाऊ गल्लीवर सप्टेंबर मध्ये पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करीत तेथील अतिक्रमण हटविले होते. मात्र आता तेथील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी पुढे येत आहे. त्यामुळे या फेरीवाल्यांना मैदानाच्या भागातच जागा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेमुळे वसईतील क्रीडाप्रेमींनी सुरवातीपासून या निर्णयाला विरोध दर्शविला जात आहे. खेळाची जागा ही खेळासाठीच राहिली पाहिजे. जर येथे फेरीवाले कायमस्वरूपी प्रस्थापित झाले तर रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण होऊन वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडू शकतो.

मैदानात फेरीवाले आल्यावर तेथे क्रीडापटू आणि क्रीडा रसिकांखेरीज सतत अन्य लोकांची वर्दळ वाढेल. त्यामुळे मैदानाच्या सुरक्षेची काळजी घेणे कठीण होईल. तसेच या फेरीवाल्यांद्वारे निर्माण होणाऱ्या सांडपाणी आणि इतर कचऱ्यामुळे मैदानावर उंदीर, घुशी, डास आणि इतर उपद्रवी जिवांचा सुळसुळाट होईल. त्यामुळे खेळाडूंसह सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे.

हे मैदान खेळाडूंच्या खेळासाठीच राहिले पाहिजे यासाठी आम्ही पालिकेला ही याबाबत निवेदन सादर केले असल्याचे क्रीडाप्रेमीं सुधीर रेले यांनी सांगितले आहे. याबाबत मैदानात फेरीवाले बसविण्याच्या संदर्भात अजूनही कोणताही निर्णय झाला नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मैदानात अतिक्रमण नको…

वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस खेळण्याच्या जागा, मैदाने कमी होत आहेत; अशा परिस्थितीत केवळ नरवीर चिमाजीअप्पा मैदानाच नव्हेे; तर कुठल्याही मैदानावर, कुठल्याही कारणास्तव अतिक्रमण झाले तर ते वसईच्या वैभवशाली क्रीडा संस्कृतीचा, क्रीडा परंपरेचा अपमान ठरेलच, परंतु येणाऱ्या पिढ्यांवरदेखील ते अन्यायकारक ठरेल, अशी संतप्त भावना व्यक्त क्रीडाप्रेमींनी केली आहे.