वसई : वसई विरार शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यावेळी गोविंदा पथकांकडून उंचच उंच मनोरे रचले जातात. मनोरे रचताना निर्माण होणारा धोका लक्षात घेता पालिकेने शहरातील गोविंदांना मोफत अपघात विमा कवच दिले आहे. या विमा योजनेतंर्गत आतापर्यंत ४ हजार ३४८ गोविंदांचा विमा उतरविण्यात आला आहे. तसेच पथकांना अधिकच्या दोन दिवसांची मुभा देण्यात आली आहे.

यंदा येत्या १६ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. अवघ्या आठवड्याभरावर हा उत्सव येऊन ठेपला असताना, वसई विरार शहरातही दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. लहान मोठ्या अशा सर्वच गोविंदा पथकांकडून मनोरा रचण्याचा सराव जोमात सुरु आहे. त्यातच दहीहंडी सणाला मिळालेल्या साहसी खेळाच्या दर्जामुळे हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमधली चुरस अधिकच वाढली आहे. उंचावरील मानाच्या हंड्या, मोठ्या रक्कमेच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदांची चढाओढ सुरू असते. पण, या चढाओढीदरम्यान मनोरे रचताना एखादा गोविंदा खाली पडून गंभीर अपघात होतो. अशावेळी उपचारादरम्यान त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरी जावे लागते.

अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून वसई विरार महानगरपालिकेकडून गोविंदांसाठी मोफत विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत ७९ गोविंदा पथकांचे अर्ज पालिकेला प्राप्त झाले आहेत. ज्यात एकूण ५ हजार ५९८ गोविंदांचा समावेश आहे. द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्यामार्फत यापैकी ४ हजार ३४८ गोविंदाचा विमा आतापर्यंत उतरवण्यात आला आहे. गेल्यावर्षी या योजनेंतर्गत ६ हजार गोविंदांचा विमा उतरवण्यात आला होता.

विमा अर्जासाठी पालिकेकडून मुदतवाढ

वसई विरार महानगरपालिकेकडून विम्यासाठी अर्ज करण्याकरिता गोविंदांना ६ ऑगस्टपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. तसेच गोविदांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे आवाहनही महानगरपालिकेने केले होते. पण, विम्यासाठी अर्ज करण्याकरीता महानगरपालिकेने गोविंदांना २ दिवस वाढवून दिले आहेत. त्यामुळे आता ८ ऑगस्टपार्यंत गोविंदांना अर्ज करता येणार आहे.

गोविंदांना अशी मिळणार मदत

वसई विरार महानगरपालिकेने प्रत्येकी गोविंदा ७५ रुपये प्रमाणे ६ हजार गोविंदांचा विमा काढण्याचे नियोजन केले आहे. यात अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला १० लाखांची मदत, एक हात, पाय, डोळा निकामी झाल्यास ५ लाख, दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास १० लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख, तसेच अपघातामुळे रुग्णालयात होणारा १ लाखापर्यंतचा खर्च विमा कंपनी यांच्या मार्फत दिला जाणार आहे. तसेच इतर किरकोळ जखमी असतील त्यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.