वसई:पावसामुळे वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. दिवसेंदिवस खड्ड्यांचे प्रमाण वाढत असल्याने नेमकी गाडी चालवायची तरी कशी असा प्रश्न नागरिकांमधून करण्यात येत आहे. या खड्ड्यांमधून वाहनचालक व नागरिक यांना धोकादायक प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे

महापालिकेच्या कार्यक्षेत्रात १ हजार १६ किलोमीटर लांबीचे डांबरीकरण केलेले रस्ते आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाळ्यात शहरातील मुख्य रस्ते व शहरांतर्गत रस्त्यावर विविध ठिकाणच्या भागात खड्डे पडले आहेत. दिवसेंदिवस या खड्ड्यांचे प्रमाण वाढत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांना सुद्धा तळ्याचे स्वरूप येत असल्याने काही वेळा हे खड्डे दिसून येत नसल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. तर काही वेळा या खड्ड्यामुळे अपघाताच्या घटना ही घडत आहेत. याशिवाय खड्डयांच्या बसणाऱ्या हादऱ्यामुळे गाड्यांच्या नुकसानासह नागरिकांना कंबरदुखी, मणक्याचे आजारांना ही सामोरे जावे लागत आहे.

विशेषतः नायगाव बापाणे रस्ता, विरार पूर्व, नालासोपारा, भोयदापाडा, वालीव, नालासोपारा पूर्व मुख्य रस्ता, सातीवली, संतोषभवन, नायगाव टीवरी रस्ता यासह शहरातील बहुतांश भागात रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था बनली आहे. काही ठिकाणी तर एक ते दीड फूट खोल खड्डे तयार झाले असून हे खड्डे जीवघेणे आहेत. अशा खड्ड्यात अडकून दुचाकीस्वार ही कोसळू लागले असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. आमच्या नायगाव पूर्वेच्या भागातील मुख्य रस्ते अक्षरशः खड्डेमय झाले आहेत. त्याकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे असे सामाजिक कार्यकर्ते चेतन घरत यांनी सांगितले आहे.

आगाशी-वसई या मुख्य रस्त्यावरील अनेक भागात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही भागात पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते. रात्रीच्या वेळी हे खड्डे लक्षात येत नसल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. निर्मळ येथील जगद्गुरु शंकराचार्य समाधी मंदिराआधी मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असून पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.खड्ड्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे यात शाळकरी मुलांच्या बसेस ही वेळेत पोचत नाहीत असे पालकांनी सांगितले आहे. महापालिकेने तातडीने या खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

महापालिकेच्या बांधकाम विभागाने खड्डे दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. जवळपास ५० ते ६० टक्के इतके खड्डे बुजविले आहेत. उर्वरित खड्डे ही लवकरच बुजविले जातील. – प्रकाश साटम, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग.

पालिकेकडून केवळ २३७४ खड्ड्यांची दुरुस्ती

वसई विरार महापालिकेने खड्डे दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. यावर्षी खड्डे दुरुस्तीच्या कामासाठी  २० कोटी रुपयांचे नियोजन केले आहे. यासाठी नऊ प्रभागात खड्डे दुरुस्तीसाठी पालिकेने १३ एजन्सी नियुक्त करून त्यांच्या द्वारे खड्डे दुरूस्त करून घेतले जात आहे. आतापर्यंत पेव्हर ब्लॉक द्वारे ६९,  खडीकरण १०६०, बी एम ३७७, बी सी ४६३, मास्टिक द्वारे ४०५ असे एकूण २ हजार ३७४ खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

खड्ड्यांमुळे वेळेचा अपव्यय

खड्ड्यामुळे अवघ्या मिनिटांचे अंतर पार करण्याची तासाभराचा कालावधी लागत आहे. वसई सातीवली हे अंतर पंधरा मिनिटांचे आहे. रस्त्याची दुरवस्था यामुळे ४५ मिनिटे वेळ लागत आहे. तर विरार साईनाथ नगर ते विरार हायवे ला पोचण्यास १५ मिनिटां ऐवजी १ तास लागतो असे प्रवाशांनी सांगितले आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर अशाच प्रकारे कसरत करून जावे लागत आहे.