वसई: सुरवातीला वसईच्या तहसीलदार कार्यालयाच्या सेतू विभागात केवळ एकच महाऑनलाईन लॉगिन आयडी होता त्यामुळे दाखले वितरणात विलंब लागत होता. आता जिल्हा स्तरावरून नवीन पाच लॉगिन आयडी उपलब्ध करून दिल्याने आता विविध प्रकारच्या दाखले वितरणात सुलभता येईल असा विश्वास वसई तहसील विभागाने व्यक्त केला आहे.
वसई तहसीलदार कार्यालयातील सेतू विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने विविध शैक्षणिक दाखले दिले जातात. दररोज दिवसाला सरासरी १२०- १५० अर्ज येत असतात. मात्र सेतू विभागात एकच लॉगिन आयडी असल्यामुळे दाखल्यांचे काम संथ गतीने सुरू होते. वसई तालुक्याची लोकसंख्या साधारण २५ लाखांच्या घरात पोहोचली आहे, त्यामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. वसई तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेअर दाखले,असे विविध दाखले सेतू विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने दिले जातात. मात्र वसई सेतू विभागात एकच लॉगिन आयडीवर काम होत असल्यामुळे दाखल्यांची अनेक प्रकरणे प्रलंबित राहत होती. विशेषतः विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी तसेच उच्च शिक्षणासाठी सेतू विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध दाखल्यांची आवश्यकता भासणार आहे. मात्र वसई सेतू विभागात एकच लॉगिन आयडीवर काम होत असल्यामुळे विद्यार्थी व पालकांची अडचण निर्माण होत होती.
वसई तहसीलदार कार्यालयातील सेतू विभागामार्फत दिले जाणारे शैक्षणिक दाखले जलद गतीने मिळण्यासाठी वसई सेतू विभागात महाऑनलाईन लॉगिन आयडीची संख्या त्वरित वाढवावी अशी मागणी करण्यात येत होती. तर याबाबत भाजपचे महेश सरवणकर यांनी सुद्धा जिल्हास्तरावर पाठपुरावा सुरू केला होता. दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालक यांची अडचण लक्षात घेता आता जिल्हा स्तरावरून वसईच्या सेतू कार्यालयासाठी नवीन पाच लॉगिन आयडी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या दाखल्यांची कामे ऑनलाइन स्वरूपात जलदगतीने पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे तहसीलदार विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दाखल्यांची सुविधा ही ऑनलाइन झाली आहे. सुरवातीला एकच आयडी होता. त्यामुळे नागरिकांना विलंबाने दाखले मिळत होते. आता ती सुध्दा संख्या वाढवून एकूण पाच केली आहे. त्यामुळे नागरिकांची दाखल्यांची कामे लवकर मार्गी लागतील.
राजाराम देवकाते, निवासी नायब तहसीलदार वसई.
तांत्रिक अडचणीमुळे विलंब
दाखल्यांची कामे ही ऑनलाइन स्वरूपात केली जात आहेत मात्र काही वेळा ऑनलाइन काम करताना सर्व्हर डाउन, संकेतस्थळ धीम्या गतीने चालणे अशी तांत्रिक अडचण निर्माण होते. त्यामुळे दाखले तयार होण्यास विलंब होतो. तरीही काही वेळा रात्री बसून ऑनलाइन दाखले तयार करावे लागतात असे तहसीलदार विभागाकडून सांगण्यात येत आहे.