वसई: वसईतील कामण येथील जिल्हापरिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार पालक करत आहेत. तसेच शाळेत नव्या शिक्षकांची भरती न झाल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
वसईच्या पूर्वेच्या भागात कामण जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. कामण हा आदिवासीबहुल भाग असल्यामुळे परिसरातील बहुतांश विद्यार्थी या शाळेत शिकण्यासाठी येतात. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या बदली प्रक्रियेमुळे जिल्हापरिषद शाळेतील पाच वर्गांना शिक्षकच नसल्याची बाब समोर आली आहे.
कामण येथील जिल्हापरिषदेच्या शाळेत सद्यस्थित १ हजार ४६ विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेत १९ शिक्षक असणे आवश्यक आहे. मात्र, शाळेत फक्त ९ शिक्षक कार्यरत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे शाळेत तात्काळ नव्या शिक्षकांची भरती करावी, अशी मागणी संतप्त पालकांकडून करण्यात येत आहे.
तसेच यासंबंधी तालुका शिक्षण विभागाने कारवाई न केल्यास संतप्त पालक आणि ग्रामस्थांकडून जनआंदोलन उभारले जाईल. तसेच जिल्हापरिषदेच्या शाळेला टाळे ठोकण्यात येईल असे पत्र गटविकास अधिकाऱ्यांना दिले असल्याचे सामाजिक दिनेश म्हात्रे यांनी सांगितले. कामण जिल्हापरिषद शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत अनेक तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या आहे. त्यामुळे तालुक्यातील इतर जिल्हापरिषद शाळेतील काही शिक्षकांची भरती येत्या काही दिवसात कामण येथील शाळेत केली जाईल असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
