वसई: फेब्रुवारी महिन्यात वसईत बांधण्यात आलेल्या शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयामुळे शेतकरी तसेच प्राणीप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत  प्राण्यांवरील लहान मोठ्या ३३ शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत तर ३७२ गायी म्हैशींवर कृत्रिम रेतन पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत. यामुळे रुग्णालयाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.

वसई विरार शहरात सुसज्ज असे पशुवैद्यकीय रुग्णालय नसल्याने जखमी, आजारी प्राण्यांच्या उपचारासाठी पशुप्रेमी तसेच शेतकऱ्यांना  प्राण्यांच्या उपचारासाठी मोठी कसरत करावी लागत होती. ही अडचण लक्षात घेऊन शासनाकडून फेब्रुवारी २०२५ मध्ये साडेतीन कोटींचा खर्च करून ६ हजार ८०० चौरस फुटांचे रुग्णालय वसईतील सांडोर येथे उभारण्यात आले आहे. यात प्राण्यांसाठी विविध विभागांसह आधुनिक उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात विविध पाळीव प्राण्यांवर उपचार केले जात असून एक्सरे, छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया, लसीकरण, अशा विविध वैद्यकीय सुविधा देखील त्यांना पुरवल्या जातात.

मागील सात महिन्यात ३ पक्षी, १२ मांजर, ५ गायी, १३ श्वानांवर अशा एकूण ३३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच गाई आणि म्हैशींच्या प्रजननासाठी वापरण्यात येणारी कृत्रिम रेतन पद्धत वापरून आतापर्यंत ३७२ गाई- म्हैशींवर उपचार करण्यात आले आहे. याचा फायदा शहरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. याचबरोबर लाळ खुरकुत, लंपी अशा संसर्गजन्य आजारांसाठी लसीकरण देखील केले जाते. तसेच आता रुग्णलयात नवे एक्स रे मशीन आणि काऊ लिफ्टिंग मशीन देखील दाखल झाले असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाने दिली आहे. वसईत शासकीय रुग्णालय सुरु झाल्यापासून प्राण्यांवर उपचार करणे करून घेणे सोपे झाले आहे. तसेच एखाद्या आपत्कालीन परिस्थितीही डॉक्टारांना संपर्क साधला असता लगेच उपचार केले जातात असे महेश भोसले या पशुपालकाने सांगितले आहे.

अधिक मनुष्यबळाची गरज

वसईत सद्यस्थितीत राज्य शासनाचे एक रुग्णालय व जिल्हा परिषदेचे ९ दवाखाने आहेत. आता उभारलेल्या रुग्णालयाच्या ठिकाणी एक डॉक्टर व अन्य तीन कर्मचारी असे केवळ चार कर्मचारी आहेत. तर बरीच पदे रिक्त असल्यामुळे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.

पशुवैद्यकीय सुविधांबरोबर रुग्णालयात शेतकऱ्यांसाठी विविध योजना, औषधे, बियाणे आणि प्राण्यांसंबंधी आजार याबद्दल माहिती देणारी सत्रे, कार्यशाळा, तसेच विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येते. – नकुल कोरडे, सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी