सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता
वसई: रात्री बाराच्या सुमारास किर्र अंधार.. एक मच्छीमार महिला मासे विकून घरी परत जात होती..त्याच वेळी समोर एक नराधम अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिला दिसले. तिने धाडस दाखवून त्या नराधमाशी दोन हात केले आणि त्या मुलीची सुटका केली. मालाडच्या कुरार येथील पुलावर घडलेला या थरारक प्रसंगात सतर्कता दाखवून मुलीची सुटका करणाऱ्या सविता कचरू कांबळे असे या धाडसी महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वसईच्या नायगाव येथून ४ मार्च रोजी ६ वर्षांच्या चिमुकल्या मुलीचे रात्री अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यां कंसा सिंग याने मुलीला पळवून मालाड पश्चिम येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेले होते. मात्र तेथील सुरक्षारक्षक रमेश आदम याने त्याला हटकले. त्यानंतर अपहरणकर्त्यांने तिला रात्रीच्या वेळी कुरार व्हिलेज येथील पादचारी पुलावर नेले. अंधारात मुलीवर अत्याचार करण्याचा इरादा होता. त्याच वेळी मालाड येथील सविता कांबळे (४८) या नेहमीप्रमाणे मासेविक्री करून घरी परतत होत्या. सिंग याच्या सोबत असलेली मुलगी रडत असल्याने कांबळे यांना संशय आला. त्यांनी विचारपूस केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे कांबळे यांचा संशय खरा ठरला. मग त्यांनी मागेपुढे न पाहता अंधारातच अपहरणकर्ता सिंग याला मारहाण करण्यास सुरुवात केली. कांबळे यांच्या या आक्रमक पवित्र्याने अपहरणकर्ता मुलीला तेथेच सोडून पसार झाला. कांबळे यांनी पोलिसांच्या ११२ क्रमांकावर दूरध्वनी करून पोलिसांना बोलावले आणि मुलीला सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात दिले. कंसा सिंग याला वसईच्या वालीव पोलिसांनी वांद्रे रेल्वे टर्मिनस येथून अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर करताना पुरावे आणि दोषारोपत्र पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी केले. वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्राकांत पाटील, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयसिंह ठाकूर यांनी जलद तपास केला.
‘सतर्कतेने गुन्हे रोखणे शक्य’
सविता कांबळे यांनी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातर्फे सविता कांबळे यांच्या सत्कार करण्यात येणार आहे. सविता कांबळे यांनी सतर्कता दाखवत अपहरणकर्त्यांशी दोन हात केले. नागरिकांनी सतर्कपणा दाखवला तर गुन्हे रोखता येतात, अशा शब्दात साहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंह ठाकूर यांनी कांबळे यांचे कौतुक केले आहे.