डॉ. यशवंत तुकाराम
सुरोशेरात्रीच्या जेवणाअगोदर आई-बाबांशी गप्पा मारत होतो. त्या दिवशी बाबा चुलत बहिणीच्या वर संशोधनासाठी दूरच्या एका गावी गेले होते. ते परतल्यावर आई त्यांना बरेच काहीबाही विचारत होती. तिच्या प्रश्नांची उत्तरे देताना आम्ही भावंडे वडिलांकडे एकटक पाहत त्यांचे बोलणे ऐकत होतो.
‘‘बरंय! आपल्यासारखंच मराडी घर आहे. दोन पांड जमीन आहे. अंगणात कणगा मांडलेला दिसला.’’
वर मुलाच्या घरची परिस्थिती आपल्यासारखीच गरीब आहे, त्यामुळे लग्न जमण्याची शक्यता आहे, एवढंच त्या बालवयात समजलं होतं. मात्र आपल्यासारखंच मराडी घर आहे, या वाक्यानं बालमनात घर केलं होतं. पूर्वी कोकणातील बरीच घरं मराडी असत. आर्थिक परिस्थिती बरी झाल्यावर काहींनी यथावकाश घरांवर कौलांचे छप्पर घातले. मात्र सर्वांच्या घरावर भाताचे माचरोंडे (मराड) असायचं. भाताची मळणी झाली की हे माचरोंडे सहज उपलब्ध होत. भाताची झोडणी झाली की खळय़ात एका बाजूला लगेच माचरोंडे बांधले जात. भाताचा एक-एक आवंढा आपटून झाला की माचरोंडे बांधणाऱ्या माणसाच्या हातात सोपवला जाई. माचरोंडा बांधणारा माणूस त्यात निष्णात असे. आवंढय़ातल्या दहा-बारा काडय़ा आडव्या करून माचरोंडा बांधायचा नि अंदाजाने बाजूला फेकायचा. बांधलेले हे माचरोंडे खळय़ात हारीने मांडून ठेवत. पुढे जेव्हा घरावरील मराड पाडले जाई, त्या दिवशी हे माचरोंडे घरावर शाकारण्यासाठी आणले जात. राबणीचे दिवस सुरू झाले की शेतीच्या कामांना वेग येई. रानातली राबणी उरकत आली की घराचे मराड पाडण्याचा दिवस ठरवला जाई. घरावर चढून मराड पाडणारे नि नव्याने माचरोंडे टाकणारे प्रत्येक गावात चार-सहा जण निष्णात असायचेच. भावकीतल्या दोन जणांना हटकले जाई. भल्या सकाळी मराड पाडायचे काम सुरू होई. त्यासाठी पहाटे लवकर उठून घरातील गाडगी, मडकी, भांडीकुंडी झाकून ठेवली जात. सकाळच्या भाजी-भाकरीची सोय भल्या पहाटेच करून ठेवली जाई. नाहीतर शेजारांच्या चुलीवर स्वयंपाक होई.
पावसाळाभर भिजलेलं मराड नंतरच्या उन्हात पार कुजून कडक झालेलं असायचं. तासाभरात सारं मराड घराभोवती पांगलेलं दिसायचं. मराड नसलेल्या घराकडे पाहवत नसायचं. घराचे वाकडेतिकडे वासे, चुलीतल्या धुरानं त्यांना आलेला काळा रंग, त्यावरच्या बांबूंच्या आडव्या रिपाही काळय़ाकुट्ट झालेल्या दिसत. काही वासे घराचा वर्षांनुवर्षे भार सोसून खालच्या दिशेने वाकलेले असते. आम्ही मुले संधी मिळाली की शिडीनं माळवटावर चढायचो नि वासे व रिपांच्या चौकोनातून आकाशाचे रुमाल मोजत असू. वासे आणि त्यांचा रंग न्याहाळत असू. एवढय़ा उंचीवरून गावातली दुसरी घरं न्याहाळणं फार आवडत असे. विहंगम दृश्याचा हाच पहिला अनुभव होता. सारी घरे एकसारखी सगळीच मराडाची होती, त्यामुळे गरिबी, दारिद्रय़ याची जाणीव त्या वयाला जाणवत नसायची.
मात्र वडीलधारे ‘‘पडशील! उतरा खाली.’’ असं म्हणत आम्हाला दम देत. कोणा तरी खराटय़ानं सारे वासे, रिपा, माळा स्वच्छ करी. कोणी एक जण खाली उतरे. माचरोडय़ांचा ढीग बैलगाडीतून आणलेला असायचा. त्या ढिगातून एक-एक माचरोंडा छपरावरील बाप्याकडे फेकला जाई. हे माचरोंडे खालच्या दिशेकडून आढय़ाच्या दिशेकडे रचले जात. जेणेकरून माचरोडय़ांचे टोक दुसऱ्या माचरोडय़ांच्या बुडाखाली झाकले जाईल. छपराच्या चारही बाजू माचरोडय़ांनी झाकल्या की पावसाळय़ापूर्वी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यानं हे मराड उडू नये म्हणून त्यावर दडपण ठेवले जाई. मग बाप्पे मंडळी खाली उतरत. घराभोवती गोळा झालेला जुन्या मराड, कचरा मोठय़ा चापात भरून माळावर नेऊन त्याचा राब बनवला जाई. यथावकाश राब पेटवला जाई.
अशा मराडय़ाच्या घराला जोरदार पावसामुळे हमखास गळती लागे. आषाढातला पाऊस जोराचा असे. मराडाची घरे हमखास गळायची. छपरातून गळणारे पाणी साठवायला घरातली भांडी अपुरी पडायची. माळवटावरच्या फळय़ांवर पाण्याचे ओघळ पडून छान नक्षी तयार होई. अशा या नक्षीकडे पाहत-पाहत झोप कधी लागायची कळत नसे. याच नक्षीतून वेगवेगळे आकार शोधण्याचा खेळ आम्ही मुले खेळत असू. संततधार पावसामुळे भिजलेलं घर लवकर सुकत नसे. कधी-कधी अंथरुणापुरतीही घरात कोरडी जागा नसायची. अशा वेळी नेमकी कोणी पाहुणा आलेला असेल, तर त्याची सोय शेजाऱ्यांच्या न गळणाऱ्या घरात केली जायची. तेव्हा मात्र घर मालकाला आपले घर मराडी असल्याचे वाईट वाटे. पण परिस्थितीपुढे नाइलाज असे. पावसाचा जोर थोडा कमी झाल्यावर गळती कमी व्हावी म्हणून भाद्रपदात माचरोंडे सोडून पुन्हा व्यवस्थित लावले जात.
दिवाळीच्या दिवसांत घरातल्या मुलांना कायम दम दिला जायचा की, मराडी घराजवळ फटाके लावायचे नाहीत. मराड पेटलं तर? या नुसत्या कल्पनेनं अंगावर काटा यायचा. कधी तरी शेकोटीभोवतीच्या गप्पांमध्ये गावच्या गावं जळाल्याची हकीकत ऐकलेली होती. एका घराला आग लागली. गावातली सगळीच घरं मराडाची होती. एकावरची ठिणगी दुसऱ्या घरावर, दुसऱ्या घरावरची तिसऱ्या घरावर, असं होता-होता सारा गाव जळून गेला. त्यामुळे फटाके पेटवण्याची मनात कायम भीती निर्माण झाली. तरी मराडाच्या घराची शोभा श्रावण-भाद्रपदात पाहावयास मिळे. आवारात लावलेल्या घोसाळी (गिलके), डांगराचे (लाल भोपळा) वेल घराच्या छप्परवर पसरत. घोसाळीची पिवळी आणि डांगराची केशरी फुले मराडाच्या घरावर शोभून दिसत. एखाद्या वनवासी महिलेने आपल्या केसात रानफुले माळली तर कशी दिसेल तसं कोवळय़ा उन्हात मराडाचं घर शोभून दिसे. भाद्रपदानंतर पाऊस आटत जाई. मग अशा वेळी चुलीचा धूर मराडातून बाहेर पडताना दिसे. कधी-कधी कोंबडय़ा घरावर उडी घेत. माचरोडय़ांतले भाताचे दाणे शोधण्यासाठी पायाच्या नखांनी मराड पसरवीत, त्यामुळेही मराडाचे घर गळत असे. घरावरच्या मराडावर चढलेल्या कोंबडय़ांना हुसकावण्याचे काम लहान मुलांना हटकून सांगितले जाई.
इतकं सारं असलं तरी मराडाच्या घरात वातावरण कसं छान असायचं. उन्हाळय़ातही घरात आल्हाददायक वाटायचं. कधी चार चिमण्या येऊन मराडय़ात घरटं बनवायच्या. त्यात अंडी घालायच्या. नवजात चिमण्यांचा चिवचिवाट घरभर पसरे. चिमण्यांकडे पाहत-पाहत लहान मुले रमायची. मोठी माणसे क्षणभर आपल्या चिंता विसरत.
एखाद्या गावची सांपत्तिक स्थिती कशी आहे, याचा अंदाज त्या गावातील मराडाची घरं किती आहेत यावरून केला जाई. आख्ख्या गावात एखादं माडीघर असे. बाकी सारी मराडाची घरं असत, मराडाची घरं हीच गावाची ओळख असायची. ‘मराडी घर’ हे व्यवच्छेदक लक्षण होतं. काळाच्या ओघात मराडाची घरं आज फारशी आढळत नाहीत, मात्र निसर्ग चक्राप्रमाणे हल्ली अनेक ढाबा अथवा महामार्गालगतच्या हॉटेलांमध्ये मराडाच्या झोपडय़ा नव्या स्वरूपात दिसू लागल्या आहेत, अर्थात या झोपडय़ांवर मराड, माचरोंडे, झावळय़ा आहेत तरी त्यात ‘घर आणि घरपण’ मात्र नाही.
surosheyashavant@gmail.com