मोहन गद्रे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काका खास रंगकामाकरता काढून ठेवलेली जुनी हाफ पॅंट आणि जुना टी-शर्ट चढवत. डोक्याला फडकं गुंडाळत आणि कोणाच्या तरी मदतीने कधी स्टुलावर स्टूल ठेवून, कधी एकाच स्टुलावर चढून, पहिल्यांदा जाड पॉलिश पेपर नि मग त्यापेक्षा थोडय़ा कमी जाड पॉलिश पेपरने चारही भिंती घासून गुळगुळीत करून टाकत. मधेमधे बायको ‘झेपेल तितकीच घासाघास करा, नंतर आजारी पडाल, मला निस्तरावं लागेल.’  हा प्रेमळ सल्ला आला तरी ‘काय नाय होत ग, तू जेवणाचं बघ’  म्हणून काम चालू ठेवत.

दिवाळी, गणपती असे मोठे सण जवळ आले की, घरातले वडीलधारी ‘आता एकदा घराला रंग काढायला हवाय,’ हे वाक्य चार-पाच वर्षांनी एकदा कधीतरी म्हणायचे. मागे कधी काढला होता? या प्रश्नाचं उत्तर आठवत नसे. मग तसा काही अगदीच खराब दिसत नसला तरी पुढल्या वर्षी जमणार नाही, यावर काही दिवस चर्चा चाले. घराला म्हणजेच चाळीतल्या सिंगल किंवा डबल रूमला, रंग काढण्याचा विचार एकदाचा पक्का होत असे, अर्थातच तो घरच्या घरीच काढायचा हे ठरलेलेच असे. तो कधी काढायचा यावर बराच विचारविनिमय झाला की विचारांती तो दिवस ठरायचा.  घरातले कुठले सामान शेजारी-पाजारी  कोणाकडे नेऊन ठेवता येईल, उंच स्टूल कोणाचे मिळणे शक्य आहे याचा अंदाज घ्यायचा. रंग कुठला? कुठल्या कंपनीचा? बहुतेक करून भिंतींना ऑफव्हाइटपासून सुरू झालेली चर्चा बहुतेक करून स्काय ब्लू, किंवा वरती फेंट ब्लू आणि खाली डार्क आणि दरवाजे खिडक्या डार्क ब्लू यावरच बहुतेक करून सहमती होत असे. कपडे असोत नाहीतर भिंतींचा रंग- तो मळखाऊ असायला हवा हे पक्के. मग कुठल्या कंपनीचा, चुना की साधा डिस्टेंपर का ऑइल डिस्टेंपर का चक्क ऑइल पेंटच.. अशी बरीच चर्चा घडून येई.  या सर्व रंगकामाच्या कौटुंबिक चर्चेचे रूपांतर जाहीर चर्चेत नकळत होऊन जाई. आजूबाजूच्या बिऱ्हाडकरूंना त्यात आपोआप  संधी प्राप्त होत असे. मुळात चाळीत कुठल्याच चर्चेत शेजाऱ्या-पाजाऱ्यांना वेगळय़ा संधीची आवश्यकता नसायचीच, ती सर्वानीच गृहीत धरलेली असे. (जरा शिकलेसवरलेले लोक रंगासाठी ‘शेड’ असे भारदस्त शब्द वापरत) गेल्या वेळेला नवीन आणलेले ब्रश गुंडाळून ठेवले आहेत, ते चालतील की नवीन आणायला हवेत, भाऊ मदतीला असेलच, पण शिवाय (हा शिवाय जरा ठळक उद्गारात अजून कोणा, भाच्याला, चुलत, मावस, आते  भावाला मदतीला बोलवूया का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे रजा किती टाकावी लागेल. (या रजा टाकण्याची एक गंमत आहे. रजा घेण्यासाठी तुम्हीच ती आधी टाकावी लागते). ऑइल पेंट  उरला  तर गॅलरी, पंखे, स्टूल, धान्य साठवायचे पत्र्याचे डबे यांचासुद्धा नंबर लागणार असतो. पण रंग उरला तर? मग, खर्च किती येईल? हाच मुद्दा सर्वात महत्त्वाचा. त्यावर आजुबाजूच्या अनुभवी लोकांच्या सल्ल्याने आणि बराच विचारविनिमय करून झाला की, मधेच कधीतरी कटकट नको, एकदम डायरेक्ट कंत्राटच देऊन टाकतो असा कधीही अमलात आणला जाणार नाही याची खात्री असलेला विचारही नुसताच डोकावून जातो. घरी काढलेला रंग खूप स्वस्त पडतो, त्याच पैशात अजून काहीतरी आणता येईल, याचा साक्षात्कार होत असे.

रंगकाम सुरू करण्याच्या आधी, कोणाच्या तरी ओळखीचा कोणीतरी, घाऊक बाजारात कामाला असतो, तेथे सामान स्वस्तात मिळते या माहितीवर, तेथून भिंती घासून काढायला दोन-तीन प्रकारचे पॉलिश पेपर, डिस्टेंपरचे पुडे, रंगाच्या टय़ुबा, बारीक-मोठे ब्रश वगैरे सर्व सामान घरी येऊन पडते. भिंतीला पडलेली भोके, चिरा, भिंतीचे उडालेले ढळपे रंग काढण्यापूर्वी भरून घेणे महत्त्वाचे, म्हणून कोणाच्या तरी ओळखीचा ‘गाबडी गुबडी’ (हा खास शब्द) भरणारा गवंडी बोलावून, ‘सामान हम देगा, खाली मजुरी बोलो’, यावर बोलीवर बोलावून, त्याच्या गरजेनुसार सर्व सामग्री आणून दिली, की एक-दोन दिवसात, गाबडी गुबडी भरण्याचे काम पुरे होते. लहान लहान भोकांची ही मोठमोठी भगदाडे होऊन भितींभर वेगवेगळय़ा देशांचे नकाशे असावेत असे प्लॅस्टरचे पांढुरके आकार दिसू लागतात.

तोपर्यंत भिंतीजवळचे आणि भिंतीला अडकवलेल्या सर्व सामानाचा ढीग खोलीच्या मधोमध आणून ठेवला जात असे. काही सामान बाहेर गॅलरीत, काही सामान, शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या कॉटखाली. घराचं रंगकाम होईपर्यंत मुलं पाटी-दप्तर घेऊन शेजारच्या काकूंकडे जात. अंघोळ करण्यापुरती घरात, बाकी सर्व काकूंच्या घरी. तेथूनच शाळेत वगैरे जाणे-येणे होत असे. काका खास रंगकामाकरता काढून ठेवलेली जुनी हाफ पॅंट आणि जुना टी-शर्ट चढवत. डोक्याला फडकं गुंडाळत आणि कोणाच्या तरी मदतीने कधी स्टुलावर स्टूल ठेवून, कधी एकाच स्टुलावर चढून, पहिल्यांदा जाड पॉलिश पेपर नि मग त्यापेक्षा थोडय़ा कमी जाड पॉलिश पेपरने चारही भिंती घासून गुळगुळीत करून टाकत. मधेमधे बायको ‘झेपेल तितकीच घासाघास करा, नंतर आजारी पडाल, मला निस्तरावं लागेल.’  हा प्रेमळ सल्ला आला तरी ‘काय नाय होत ग, तू जेवणाचं बघ’  म्हणून काम चालू ठेवत.

मग पहिला प्रायमर मारायला घेत. ते सोपस्कार पूर्ण झाले की, रंग लावण्याचा महत्त्वाचा टप्पा सुरू होई. मग जुनी बालदी काढून त्यात रंग तयार होत जाई. कार्डावर दाखवलेली रंगाची छटा आणणे मोठे अवघड काम, मग बराचसा जमलाय, अगदी हुबेहूब जमणराच नाही, असं म्हणून रंगाच्या शेडचं पक्क ठरलं की मग प्रत्यक्ष रंग लावायला सुरुवात होई. अर्थातच या सर्व रंगकाम कार्यक्रमात, आजूबाजूच्या शेजाऱ्यांना सल्ले देण्याची मुभा असायचीच. आधी बाहेरची खोली, मग आतली म्हणजे स्वयंपाक खोली, असे सर्व रंगकाम पूर्णत्वास जात असे. रंगाचे दोन हात पुरे होतील म्हणता म्हणता दोनाचे तीन लावावे लागत असत. वर आढय़ाला रंग काढणे म्हणजे मोठं जिकिरीचे काम. उघडे डोळे संभाळत, मान मागे टाकून, उलटे रंगाचे ब्रश मारणे म्हणजे मोठं कठीण काम.

चार दिवसांत काम संपेल असा मांडलेला हिशेब प्रत्यक्ष आठवडा झाला तरी पुरा होत नसे. रात्री लाइट लागल्यावर रंग एकदम उठून दिसतो, यावर बहुतेकांचं एकमत होत असे, पण काही शेजाऱ्यांकडून मात्र यांनी उगाच डिस्टेंपर काढला, एकदाच ऑइल काढायला पाहिजे होता, पैसे वाचवायला गेलं की असंच होतं, वगैरे शेरे ऐकू येत. दोन दिवस सगळं काढलेलं सामान जागच्या जागी धुऊनपुसून लावण्यात जातात. शेजारीपाजारी गेलेलं सामानाची घरवापसी होत असे. एक अख्खा रविवार, फरशीवरील रंगाचे डाग घालवून, फरशी धुऊन साफ करण्यात जाई. 

उरलेल्या रंगात लाकडी स्टूल, पंखे, टय़ूब लाइटच्या पट्टय़ा, धान्य ठेवायचे पत्र्याचे डबे, शेजाऱ्यांचं ‘रंग लावून परत देऊ’ या बोलीवर आणलेले दुसऱ्यांचे उंच स्टूल ज्या घरचे त्या घरी परत जात असे आणि त्या रंग लावून झगमगून उठणाऱ्या घरात आता बघा अगदी हळू बोललं तरी किती मोठय़ांनी ऐकू येतं म्हणता म्हणता, मोठय़ा आवाजात गप्पा मारत, स्वच्छ रंगीत घरातला संसार पुढे सुरू होई. मुलगा आईला म्हणे, ‘‘तुझं पंचांग अडकवायचा खिळा काढलेला नाही. त्यालापण रंग लावलाय.’’

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rubbing the walls and making them smooth painting wall in festival vasturang article ysh