अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या तीन अत्यावश्यक गरजांपैकी तिसऱ्या क्रमांकावर असलेला निवारा म्हणजे ‘घर’. खिशाचे आकारमान, आवश्यकता, सोय, परिस्थिती बघून लहान-मोठे घर घेतले जाते. आवश्यकता, गरज, हौस, कर्तव्य, जागेची उपलब्धता हे बघून खरेदी केलेल्या वस्तूंबरोबरच मिळालेल्या भेटवस्तूंनी घर भरून जाते. घरात कितीही सोयी करून ते व्यवस्थित लावले तरी ते विस्कटतेच आणि त्यामुळे आवराआवर नावाचा उद्योग करावा लागतो.

गुढीपाडवा, गौरी-गणपती, दसरा, दिवाळीसारखे सण, लग्नकार्य डोहाळे जेवण, बारसे, पूजा अशी धार्मिक कार्ये असली की मोठय़ा आवराआवरीनेच समारंभाच्या तयारीचा शुभारंभ होतो. याच्यासाठी ‘काही दिवस’ द्यावे लागतात. त्यासाठी व्यवस्थापन मनात रुजावे लागते. वरपासून म्हणजे छतापासून खालपर्यंत अशी कामाची दिशा असते. लांब दांडय़ाच्या झाडूने किंवा केरसुणीने जळमटे काढणे, हे मानेला चांगला व्यायाम देणारे काम. पंखे, टय़ूबलाइट, खिडक्यांचे ग्रिल, जाळय़ा, विजेची बटणे, दरवाजे झाडून पुसून घेणे तसेच या झाडाझडतीमुळे खालच्या सामानावर म्हणजे सेठी, सोफा, डबलबेड, टेबल यावर पडलेला कचरा झटकून केर काढावा लागतो. ही झाली बाहेरची वरवरची स्वच्छता म्हणजे आवराआवरीची बर्हिरग साधना. अंतरंग साधना ही वेळखाऊ, किचकट आणि विचारपूर्वक करावी लागते. आवराआवरीचे खरे काम हे सामानाच्या अंतरंगामध्ये म्हणजे कपाटांचे खण, ड्रॉवर यामध्ये दडलेले असते. प्रत्येक भाग सुटासुटा आवरावा लागतो. त्यातील सगळे सामान आधी बाहेर काढावे लागते.

काय काय आहे ते बघावे लागते. खण किंवा ड्रॉवर झाडून ओल्या फडक्याने पुसून घ्यावे लागतात. मग काढलेले सामान आहे त्याच जागी ठेवायचे आहे की जागा बदलायचीय, हा विचार करावा लागतो. तो विचार पक्का झाला की बाहेर काढलेल्या सगळय़ा गोष्टी पुन्हा व्यवस्थित आत ठेवाव्या लागतात. कपडे असले तर नीट घडय़ा कराव्या लागतात. जे वापरता येण्याजोगे नसतील त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ते वेगळे ठेवावे लागतात. समारंभांना घालण्याचे कपडे ठरवून ते घालण्याजोगे होण्यासाठी इस्त्रीसारखे संस्कार करून आणण्यासाठी बाहेर किंवा खणांत एका बाजूला जमा करावे लागतात. त्यामुळे कपडय़ांची काढ-घाल करताना नुकताच आवरलेला खण विस्कटत नाही. औषधे असतील तर त्याच्यावरच्या ‘एक्स्पायरी डेट’ बघून टाकण्याजोगी असतील तर ती टाकून द्यावी लागतात. कधी घरात आहे की नाही, हे न बघता औषधे खरेदी केलेली असतात. आवराआवर करताना ही गोष्ट लक्षात येते आणि नेमक्या कोणत्या गोष्टी किती आहेत, याचा अंदाज येतो. एखादी आधी शोधूनही न सापडलेली गोष्ट मिळून जाते. काहीही न बघता कोणतीही गोष्ट फेकून देणे म्हणजे आवराआवर नव्हे, त्याची योग्य मांडणी अपेक्षित असते.

विस्कटलेल्या गोष्टी नीट ठेवल्यानंतर दृष्टीसुख तर मिळतेच पण थोडी रिकामी जागाही तयार होते. त्याच जागेची आपल्यात सामावून घेण्याची क्षमता वाढते. काही गोष्टी हव्यासामुळे आणलेल्या असतात पण वापरलेल्या नसतात, त्याची योग्य दखल घ्यावी लागत. एखादी गोष्ट दोन-तीन ठिकाणी सापडते. त्यावेळी ती एकाच ठिकाणी ठेवणे म्हणजे आवराआवर. उदा. रुमालासारखी वस्तू इकडेतिकडे ठेवलेली आढळते, त्यामुळे वेळेला पटकन मिळत नाही, आणि त्याच्याशिवाय तर चालत नाही. म्हणून एकाच ठिकाणी ठेवणे आवश्यक असते. स्वयंपाकघराच्या बाबतीत जास्त काळजी घ्यावी लागते. सगळे डबे, बाटल्या उघडून बघाव्या लागतात. एखादा पदार्थ दोन-चार दिवसांनंतर विस्मृतीच्या खाईत गेल्यामुळे खराब होतो. कधी मुंग्यांच्या आक्रमणाला तोंड द्यावे लागते. डबे रिकामे ठेवूनही चालत नाही, छोटय़ा बच्चे कंपनीच्या, येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या ‘हातावर’ ठेवण्यासाठी ‘भरलं’ घर हवं ना! त्याचा विचार करून आवडीनिवडी सांभाळत खाऊचे डबे भरून ठेवावे लागतात.

खानपानसेवेच्या ‘मेनू’नुसार कच्चा माल आहे की नाही, याचा अंदाज घ्यावा लागतो. नेहमीपेक्षा जास्त ‘आवक’ लागते. पाहुणे रावळे हिशोबात धरून ताट, वाटय़ा, भांडी, क्रोकरी सहज हाताशी येईल अशी ठेवावी लागते. हातपुसणी, पायपुसणी बदलावी लगतात. साबण, लिक्विड सोप काढून ठेवावा लागतो. घराचे रूप नावीन्यपूर्ण, कलात्मक दिसण्यासाठी दाराचे तोरण, खिडक्यांना नवीन पडदे, बेडशीट, कुशन कव्हर याची योजना करावी लागते. बैठक व्यवस्था आकर्षक करून सुगंधित पुष्परचना केल्यास प्रसन्न वाटेलच शिवाय कौतुकाच्या नजरा झेलायला मिळतील हे नक्की. घराचा असा ‘मेकओव्हर’ मनाला उभारी देऊन जाईल.

ही झाली काही कारणाने किंवा ठरावीक काळाने ठरवून केलेली आवराआवर. पण कधीतरी कोणीतरी येणार असल्याची कानगोष्ट होते. कारण फोन केल्याशिवाय येणे आजकाल अप्रशस्त मानले जाते. मध्ये काही तासांचा अवधी असेल तर आपण झटपट होणारी आवराआवर करतो. उदा. इतस्तत: लोंबकळत असलेले कपडे खणांत ढकलून देतो. अस्ताव्यस्त पडलेली वर्तमानपत्रे नीट रचतो किंवा पिशवीत भरून रद्दीवाल्याकडे पोहोचवतो. अभ्यासाचे किंवा लेखनाचे प्रदर्शन व्हायला नको म्हणून ते साहित्य खणांत ढकलतो. शिवणकामाचा पसारा तात्पुरता कपाटात दडवतो. फ्रीजच्या डोक्यावरचा अतिरिक्त भार थोडा हलका करतो. जागा सोडून मध्येमध्ये लोळणाऱ्या सोफ्यावरच्या उशांना त्यांच्या जागा दाखवतो. छोटे कंपनीच्या खेळण्यांचा प्रपंच आवरून त्यांना थोडा वेळ त्याची आठवण होऊ नये म्हणून लपवून ठेवतो.

शोभेच्या पेन स्टँडमध्ये खरी, चालणारी, लिहिणारी पेनं उभी करतो. सगळय़ा बंद कपाटांमुळे ही लपवाछपवी सहज जमते आणि घर नाहूनमाखून तीट, काजळ घालून बसलेल्या लहानग्याप्रमाणे नेटके दिसते. कोणासमोर खण उघडण्याची वेळ आल्यास धबधब्याप्रमाणे वस्तू अंगावर येणार नाहीत, एवढी काळजी घेतली की पुरे. एखादा पाहुणा मात्र सरप्राईज देण्याच्या खास उद्देशाने न सांगता येतो. घर कामात रमलेले असते. घरातले काही हात पसारा करत असतात, काही हात आवरत असतात. नियमानुसार सगळं जिथल्या तिथे ठेवणारे, कडक इस्त्री न मोडू देणारे ‘घर’ औषधालाच सापडते. दारावरची बेल वाजते. ‘आत्ता कोण आलं..’ या मनातल्या गुंत्यामुळे दार उघडताना चेहऱ्यावर विविध भावनांचा पसारा होतो. आवडते, जिव्हाळय़ाचे बेट बघून तो पसारा क्षणार्धात आवरला जातो. आणि प्रसन्न हास्याने स्वागत समारंभ साजरा होतो. सर्व पसाऱ्यानिशी घर उजळून निघते.

suchitrasathe52@gmail.com