घर  म्हणजे केवळ नुसत्या भिंती नव्हेत.  त्या घराला घरपण देण्यात अंतर्गत सजावटीचा मुद्दा फार महत्त्वाची भूमिका बाजावतो. घराच्या अंतर्गत सजावटीबाबत मोलाचं मार्गदर्शन करणारं सदर.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वयंपाकाचा ओटा जितका महत्त्वाचा तितक्याच महत्त्वाच्या ओटय़ाच्या वरील भागात लावल्या जाणाऱ्या टाइल्स. या टाइल्स लावण्याचा मूळ उद्देश खरे तर स्वयंपाक करतेवेळी उडालेले तेल-तूप या गोष्टींनी भिंतींना येणाऱ्या ओशटपणा पासून भिंतींना जपणे. परंतु माणसाला निसर्गत:च सौंदर्य दृष्टीची देणगी असल्यामुळे याही ठिकाणी त्याने सौंदर्य नसते शोधले तरच नवल.

आजच्या आधुनिक काळात तर टाइल्ससोबतच बॅक पेंटेड ग्लास अथवा अगदी स्टिकरचादेखील वापर ओटय़ा वरील भिंत सजविण्यासाठी केला जातो. सर्वात आधी आपण टाइल्स चा विचार करू. निरनिराळ्या प्रकारच्या व आकारांच्या सिरॅमिक टाइल्सचा वापर ओटय़ावरील भिंतीसाठी पूर्वापार होत आला आहे. जो आजच्या काळातही कालबाहय़ समजला जात नाही.

अगदी लहानात लहान ३ इंच x३ इंच टाइल्सपासून ते मोठय़ात मोठय़ा ४८ इंचx२४ इंच पर्यंत निरनिराळ्या आकारात बाजारात टाइल्सची उपलब्धता आहे. सर्वाना परवडतील अशा १८ इंच x१२ इंच किंवा २४ इंच x १२ इंच या आकारमानातील टाइल्स रु.४५ ते रु.७५ प्रति चौ. फूटपासून बाजारात सहज मिळतात. त्यापुढे जाऊन आपापल्या बजेटप्रमाणे कोणत्या टाइल्स वापरायच्या हे आपण ठरवू शकतो.

टाइल्स लावण्याचेही आपल्याकडे निरनिराळे पर्याय असतात. एक म्हणजे मोठय़ात मोठय़ा टाइल्स वापरायच्या जेणेकरून कमीत कमी जोड आल्यामुळे, ओटय़ावरील भिंत हि एकसंध दिसायला मदत होते. जितके जोड कमी तितका मेंटेनन्सदेखील कमी, परंतु यातही पुन्हा आवडीचा भाग आलाच. बऱ्याचदा अनेक लहान लहान टाइल्सचा वापर करून भिंतीवर सुरेख म्युरल्सदेखील चितारता येतात. अर्थात त्यालाही पर्याय म्हणून मोठय़ाच टाइल्समध्ये अनेक लहान टाइल्स बसविल्याचा भास निर्माण करणाऱ्या तयार म्युरल डिझाइनच्या टाइल्सदेखील बाजारात मिळतात. या टाइल्सचा फायदा म्हणजे कमी खर्चात भिंतीला उत्तम परिणाम देता येतो.

ओटय़ाच्या वरील भागातील टाइल्स निवडताना त्यांच्या पृष्ठभागाविषयी मात्र थोडे जागरूक राहणे गरजेचे असते. शक्यतो फार खरखरीत किंवा टेक्स्चर असलेल्या टाइल्स वापरू नयेत, जेणेकरून स्वछता ठेवताना जास्त अडचण येणार नाही. एरवी टाइल्स लावलेली भिंत ही कधीही सुंदर, भक्कम आणि टिकाऊ हल्ली टाइल्स या पारंपरिक प्रकार सोबतच अनेक इंटिरियर डिझायनर्स बॅक पेंटेड ग्लासलादेखील पसंती देतात. हा खरं तर अतिशय देखणा परंतु महागडा पर्याय. बॅक पेंटेड ग्लासचं देखणेपण हे तिच्या चकचकीत दिसण्यात आणि अखंडतेत सामावलेलं आहे. अतिशय गुळगुळीत पृष्ठभागामुळे स्वच्छदेखील पटकन होते.

ही दिसायला जितकी सुंदर तितकेच ती लावण्याचे कामही कसबाचे. बॅक पेंटेड ग्लास लावायचे ठरल्यावर काही महत्त्वाच्या गोष्टी आधी विचारात घेतल्या पाहिजेत. जसं की ओटय़ावर जिथे कुठे स्विच बोर्ड येणार असतील त्या जागा आधीच निश्चित केलेल्या असाव्यात व त्याप्रमाणे निश्चित मापे देऊन काचवाल्याकडून आधीच हवे तिथे योग्य मापाचे खाचे कापून घ्यावेत. इतरदेखील कोणते खाचे हवे असल्यास ते आधीच ठरवावेत, कारण एकदा ग्लास साइट व आल्यानंतर त्यात कोणतेही  फेरबदल शक्य नसतात. ग्लासदेखील शक्यतो toughen करून घ्यावी म्हणजे काम करताना पटकन काही आदळल्यास तडा जाणार नाही.

ओटय़ावर ही ग्लास लावण्याच्या देखील अनेक पद्धती आहेत. बऱ्याचदा adhesive  ने ग्लास चिकटवली जाते. हा एक चांगला पर्याय आहे परंतु असे करताना योग्य प्रकारचे adhesive   वापरले पाहिजे आणि त्यासोबतच लावणारा कारागीरदेखील त्या कामात निष्णात असला पाहिजे, अन्यथा ग्लास चिकटविल्यावर dhesive  चे डाग दिसू शकतात. दुसऱ्या प्रकारात स्क्रूने ग्लास लावली जाते. हा सर्वात सुरक्षित प्रकार. यात ग्लास सुटण्याची किंवा तडकण्याची शक्यताच मावळते. इतर काही पर्यायांमध्ये अ‍ॅल्युमिनियमच्या फ्रेममध्ये देखील ग्लास बसविता येते.

टाइल्स असोत की बॅक पेंटेड ग्लास दोन्ही तसे वेळखाऊ  पर्याय. तुम्हाला जर झटपट तुमच्या स्वयंपाक खोलीचे रूप पालटायचे असेल ते देखील एका दिवसात तर तेही शक्य आहे. यासाठी बाजारात बॅक स्प्लॅश स्टिकर्स उपलब्ध आहेत. ज्या प्रकारे भिंतींवर वॉल पेपर लावला जातो तसाच ओटय़ावरील भिंतीसाठी आपण या स्टिकर्सचा वापर करू शकतो. मेटॅलिक, थ्रीडी, ग्लास म्युरल्स अशा निरनिराळ्या रूपांत ही स्टिकर्स मिळतात. अजून जरी हे स्टिकर्स फारसे लोकप्रिय नसले तरी लवकरच त्यांचाही वापर वाढेल.

थोडक्यात काय घराचा कोपरान्कोपरा सुंदर करण्यासाठी आज बाजार भरलेला आहे, तुम्ही फक्त निर्णय घ्यायचाय.

(इंटिरियर डिझाइनर)

ginteriors01@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiles of kitchen platform