चीनची भिंत भेदून करोना विषाणू मध्य आशिया आणि निर्वासितांचे लोंढे थोपवता-थोपवता थकलेल्या युरोपात पोहोचला आहे. ‘ब्रेग्झिट’मुळे ढेपाळलेल्या युरोपीय महासंघाला बसलेला हा तिसरा तडाखा. युरोपच्या अर्थव्यवस्थेत पडझड सुरू झाली आहे. दुसरीकडे जागतिक भांडवली बाजार आणि तेल बाजारही घसरला आहे. इराणसह फ्रान्स, इटलीमध्ये करोनाने माजवलेल्या अनर्थाची ही वृत्तस्पंदने..

अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार-संघर्षांत होरपळलेल्या आशियाई अर्थव्यवस्था सावरत असताना करोना विषाणू उद्रेक झाल्यामुळे व्यापार आणि शहरे ठप्प झाली आहेत. करोनाने जागतिक पुरवठा साखळीवर हल्ला केल्याने आशियाई देशांतील अर्थव्यवहार मंदावू शकतात, असा धोक्याचा इशारा देणारा लेख ‘इराण डेली’ने हाँगकाँगमधील अर्थतज्ज्ञांच्या हवाल्याने प्रसिद्ध केला आहे. करोनाने निर्मनुष्य हॉटेल्स आणि रिकामे विमानतळ मोठय़ा धोक्याची जाणीव करून देत आहेत. आशियाई देशांच्या अर्थव्यवस्था कमकुवत होऊ  शकतात, असा अंदाज सिंगापूरमधील ‘आयएनजी’ संस्थेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ रॉबर्ट कार्नेल यांनी या लेखात व्यक्त केला आहे. पर्यटन व्यवसाय कोसळल्याने आशियाच्या अर्थव्यवस्थांवर करोनाचा भयानक परिणाम संभवतो, असेही या लेखात म्हटले आहे.

फ्रान्सच्या ‘ल माँद’ वृत्तपत्राने करोनाच्या आर्थिक दुष्परिणामांची चर्चा करणारा लेख प्रसिद्ध केला आहे. करोनाने जागतिक अर्थव्यवस्थेला धोका निर्माण केला असून भांडवली बाजारासाठी गेला आठवडा आव्हानात्मक होता. आता युरोपमध्ये मंदी अपरिहार्य आहे. पंरतु मध्यवर्ती बँका हस्तक्षेप करतील, अशी खात्री असल्याने गुंतवणूकदारांनी श्वास रोखून धरला आहे, असे निरीक्षण या लेखात नोंदवले आहे. ‘ल माँद’च्या संपादकीयात करोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज अधोरेखित केली आहे. या संकटामुळे परस्पर आंतरराष्ट्रीय संवादाची जाणीव वाढली आहे. तथापि माघार आणि बहिष्कार हा उपाय नाही, याउलट आंतरराष्ट्रीय समन्वय आणि सहकार्याची आवश्यकता आहे, असे हे संपादकीय म्हणते. त्यात चीनला चिमटेही काढले आहेत.

करोनाने जागतिक तेलबाजाराचा समतोल कसा बिघडवला आहे, याचे चिंताजनक विवेचन ‘तेहरान टाइम्स’मधील लेखात केले आहे. तेलदरांमध्ये घसरण होत असल्याकडे त्यात लक्ष वेधले आहे. चीन दररोज सुमारे १ कोटी ४० लाख बॅरल तेलाचा वापर करतो. परंतु या देशातील परिस्थिती सामान्य होत नसल्याने तेलाची बाजारपेठ विस्कळीत झाली आहे. जुना साठा संपताना चीनने पुन्हा तेलाची मागणी केली नाही तर तेलदर आणखी पडतील, असे भाकीत या लेखात केले आहे. अमेरिकेतील विविध शेअर बाजारांचे निर्देशांक कोसळत असल्याची आणि जागतिक बाजारात तांब्यासह अन्य धातूंचे दर उतरत असल्याची दखलही लेखात घेतली आहे. पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या संघटनेच्या (ओपेक) बैठका अपेक्षित असल्या, तरी रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यात तेलखरेदी कराराची चिन्हे नाहीत. परंतु आपण बाजारातील तेलाचा पुरवठा घटवला तर त्याचे स्थान अमेरिकी शेल ऑइल घेईल हे रशिया जाणून आहे, अशी सूचक टिप्पणीही लेखात करण्यात आली आहे.

युरोपीय समुदायाचे नेते आधीच ब्रेग्झिट, ट्रम्प आणि तीव्र आर्थिक अशक्तपणामुळे बेजार आहेत. त्यात आता करोनाची भर पडल्याचे भाष्य ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मधील लेखात केले आहे. करोनाने युरोपमध्ये हाहाकार माजवल्याने तेथील अर्थव्यवस्थेला बसू लागलेल्या तडाख्याच्या गंभीर परिणामांची चर्चा हा लेख करतो. युरोपची १९ लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था डळमळू लागली आहे, तर चीन, इटली आणि जपानच्या ३० टक्के जागतिक उत्पादनावर परिणाम झाला आहे. एखाद्या रोगाची साथ जागतिक आर्थिक पेचप्रसंगाइतकीच गंभीर परिस्थिती निर्माण करू शकते. करोनाच्या या अनपेक्षित आर्थिक धक्क्याविरोधात युरोपीय मध्यवर्ती बँकेची सज्जता असमाधानकारक असल्याचे भाष्यही या लेखात केले आहे. सुमारे एक लाख ४४ हजार कर्मचारी असलेल्या मर्सिडिज् मोटारी बनवणाऱ्या जर्मनीच्या डेम्लर कंपनीलाही करोना अर्थसंकटाची झळ बसली आहे. करोना पेचप्रसंगाशी सामना करणे हे शासकीय व्यवस्था आणि समाजापुढील आव्हान आहे, अशी टिप्पणीही लेखात केली आहे.

करोना विषाणू हे युरोपीय महासंघासाठी निर्वासितांच्या संकटापेक्षा मोठे संकट ठरू शकते, असा इशारा ‘सीएनबीसी’ या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील लेखात देण्यात आला आहे. निर्वासितांचे संकट झेलल्यानंतर युरोपच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक रचनेपुढे करोनाचे संकट उभे ठाकले असून युरोपसाठी हा कसोटीचा काळ आहे, अशी टिप्पणीही त्यात करण्यात आली आहे.

(संकलन : सिद्धार्थ ताराबाई)