देवयानी देशपांडे

कुठलेही स्थित्यंतर झाल्यानंतर आपण पुन्हा भारतीय रंगढंग ध्यानात घेऊन धोरणे आखली, असे भारताचा इतिहास सांगतो. तोच शिरस्ता करोनोत्तर सामाजिक स्थित्यंतरानंतरही कायम राहील का?

करोना महामारीने संपूर्ण जगासमोर अनेक आव्हाने उभी केली आहेत. अस्तित्व टिकवणे, अर्थार्जन करणे इथपासून ते जागतिक स्थलांतर असा या आव्हानांचा प्रचंड आवाका आहे. ही आव्हाने संपूर्ण जगासमोर आहेत हे खरे आहे. मात्र, भारतीय समाजाचा ऐतिहासिक परामर्श घेऊन याबाबत काही भविष्यलक्ष्यी अंदाज वर्तवता येतो का, ते पाहू या..

यासाठी भारताच्या वाटचालीचे तीन टप्प्यांत विभाजन करू. पहिला टप्पा स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या आगमनाचा. दुसरा टप्पा सन १९९० च्या दशकातील जाखाउ (जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरण) धोरण स्वीकृत करण्याचा आणि तिसरा, करोना वैश्विक महामारीचा टप्पा आपण सर्व आज अनुभवत आहोत. भविष्याबाबत अंदाज वर्तवण्यासाठी हे तीन टप्पे का निवडले आणि त्याची यथार्थता काय, ते आता समजून घेऊ. वर नमूद केलेल्या टप्प्यांपैकी पहिला टप्पा प्रामुख्याने राजकीय घडामोडींचा, दुसरा टप्पा प्रामुख्याने आर्थिक घडामोडींचा आणि तिसरा चालू टप्पा प्रामुख्याने सामाजिक घडामोडींचा आहे. या टप्प्यांच्या अभ्यासावरून भविष्याबाबत अंदाज वर्तवणे शक्य आहे.

ब्रिटिश वसाहतवादाचा टप्पा भारतीयांमध्ये ‘राजकीय’ जाणीवजागृती करणारा ठरला. म्हणजे व्यक्तीचे हक्क, अधिकार, स्वातंत्र्य, समानता या मूल्यांबाबत जाणीव निर्माण होऊन त्या अनुषंगाने काही पावलेही उचलली गेली. सतीबंदीचा कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा, स्त्रीशिक्षणावर देण्यात आलेला भर ही त्याची काही उदाहरणे म्हणता येतील. या टप्प्यात आपली स्वत:ची राज्यव्यवस्था असावी, राज्य परकीयांचे नव्हे तर स्वकीयांचे असावे, अशी तीव्र जाणीव भारतीयांना झाली; त्यातूनच भारतीय स्वातंत्र्यलढा आकारास आला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वकीयांचे राज्य स्थिरस्थावर झाले.

त्यानंतर पुढचा टप्पा आर्थिक स्थित्यंतराचा आहे. पुन्हा एकदा परकीय व्यवस्थेच्या सांगण्यावरून भारतीयांनी बाजारपेठ खुली केली. या काळात अनेक आर्थिक, सामाजिक चढ-उतार आपण अनुभवले. वैश्विक समाज जोडले गेले तसे अधिकाधिक संधी आपल्यासाठी उपलब्ध झाल्या. भारताने सर्वार्थाने वैश्विक स्पर्धेत उडी घेतली, असे म्हणता येईल.

परंतु या दोन्हीही टप्प्यांतील पुढील दोन समान बाबी आपल्या निरीक्षणातून सुटता कामा नये :

(१) पहिल्या टप्प्यात राजकीय स्थित्यंतरे झाल्यानंतर स्वकीयांचे राज्य येण्यापूर्वी आपण ‘भारतीय’ राज्यघटना निर्माण केली.

(२) आर्थिक स्थित्यंतराच्या दुसऱ्या टप्प्यात खासगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण या धोरणाचा स्वीकार केला, परंतु कालांतराने पुन्हा भारतीय धाटणीच्या उद्योगांना, अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषीक्षेत्राला प्राधान्य दिले जावे असा युक्तिवाद करण्यात आला. म्हणजेच, पुन्हा भारतीय मातीला रुचेल असेच धोरण स्वीकारण्याचा कल अधोरेखित झाला. नव्हे, त्या दिशेने आजही आपली वाटचाल सुरू आहे. लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्राला आपण देत असलेले प्राधान्य हे त्याचे उदाहरण आहे. उपरोक्त दोन्हीही स्थित्यंतरांमध्ये आपण देशी तोडगे शोधण्याचा प्रयत्न केला हे मान्य करू या. त्या दिशेने आणखीही असंख्य प्रयत्न होणे आवश्यक आहे हेदेखील खरे आहे.

आज आपण ज्याचे साक्षीदार आहोत तो तिसरा टप्पा सामाजिक स्थित्यंतराचा आहे. करोना महामारीचा प्रश्न परकीयांनी आपल्यावर लादलेल्या राजकीय किंवा आर्थिक धोरणाप्रमाणे नाही. तो आपल्याप्रमाणे जगभरातील सर्व समाजरचनांना आव्हान देणारा आहे. त्याचे स्वरूपही अदृश्य आहे. या टप्प्यात आपण प्राप्त परिस्थितीचा भारतीय पद्धतीने सामना करत आहोत. म्हणूनच हा सामाजिक स्थित्यंतराचा टप्पा काही भारतविशिष्ट सामाजिक तोडगे शोधण्यास दिशादर्शन करील असा अंदाज वर्तवणे शक्य आहे.

भारतीय समाजशास्त्रावर समाधानकारक लेखन झाले नाही, ही बाब अनेकांनी ध्यानात आणून दिली आहे. डॉ. इरावती कर्वे, एम. एन. श्रीनिवास यांसारखे काही अपवाद वगळता भारतीय समाजशास्त्रावर तपशीलवार लेखन झालेले नाही. ते इथून पुढच्या काळात होण्याची दाट शक्यता आहे. येत्या काळात भारतीय समाजरचना, समाजाचे वैविध्य, विविधतेत एकता यांखेरीज भारतीय  कुटुंबव्यवस्था,  शिक्षणसंस्था, धर्मसंस्था यांवरही पुनर्विचारांती भाष्य करणे आवश्यक ठरेल.

स्थित्यंतर झाल्यानंतर आपण पुन्हा भारतीय रंगढंग ध्यानात घेऊन धोरणे आखली, असे इतिहास सांगतो. त्यावरून करोनोत्तर सामाजिक स्थित्यंतर झाल्यानंतरही आपण भारतीय समाजाकडे ‘भारतीय’ धाटणीचा समाज या अर्थाने पाहू लागू. या समाजासाठी आवश्यक ती उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू, हे नक्की. पूर्वी नमूद केलेल्या दोन टप्प्यांपेक्षा सामाजिक स्थित्यंतराचा टप्पा व्यापक असणार आहे. यामध्ये राज्यसंस्था, सामाजिक संस्था, आर्थिक संस्था या सर्वाचा समावेश होतो. उपरोक्त तीनही टप्प्यांमध्ये खास ‘भारतीय’ सूत्र कायम राहिले आहे हे आपल्या ध्यानात येईल. इथून पुढेही ते तसेच राहील ही खात्री वाटते.

भारतीय सूत्र कायम ठेवणे म्हणजे समाज ‘बंदिस्त’ होणे असा अर्थ अभिप्रेत नसून, समाजासाठी काय अनुरूप आहे याचा विचार करणे होय. भारताने परिवर्तनाच्या विविध टप्प्यांवर बदल अनुभवले आहेत. त्याचप्रमाणे, उपरोक्त तीनही टप्प्यांच्या पल्याड जाऊन भारतीय परंपरेत कालसुसंगत उत्तरे शोधण्याचा प्रयत्न होईल, हा भविष्यलक्षी विचार करता येतो. भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय़ म्हणून असे बदलाचे टप्पे आपण यापूर्वीही अनुभवले आहेत.

उपरोक्त पहिल्या टप्प्यात आपण जगभरातील देशांसह असलेले राजकीय संबंध पुनव्र्याख्यीत केले. दुसऱ्या टप्प्यानंतर जगभरातील देशांप्रति आर्थिक धोरणांची पुनर्माडणी केली. त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्प्यानंतर, भारतीय लोक एखाद्या देशाची खाद्यसंस्कृती, राहणीमान पद्धती स्वीकारतील किंवा नाकारतील इथपासून अनेक बाबतींत बदल होणे शक्य आहे. म्हणजेच, सामाजिक स्थित्यंतरानंतरच्या काळात भारताचे इतर देशांशी असलेले सामाजिक अनुबंध कोणते वळण घेतात, ते पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

लेखिका लोकप्रशासन आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासक ddevyani31090@gmail.com